घरमहाराष्ट्रएनसीबीच्या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश :नवाब मलिक

एनसीबीच्या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा समावेश :नवाब मलिक

Subscribe

के.पी. गोसावी, मनीष भानुशालीचा एनसीबीशी काय संबंध?

अमली पदार्थ नियंत्रक पथकाने (एनसीबी) २ ऑक्टोबरला एका आलिशान क्रूझवर केलेल्या कारवाईला बुधवारी वेगळे वळण मिळाले. एनसीबीने अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली आहे. या कारवाईत भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. हा गौप्यस्फोट करताना मलिक यांनी भाजप कार्यकर्त्यांचा फोटो आणि व्हिडिओ उघड केला.

एनसीबीने मुंबई-गोवा क्रूझवर कारवाई करून काही लोकांना अटक केली होती. यामध्ये आर्यन खान, अरबाज मर्चंटसह बड्या धेंड्यांचा समावेश होता. मात्र, आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के.पी.गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नाही. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नाही. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाईल लोकांना अटक केली? असा सवाल मलिक यांनी केला.

- Advertisement -

कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून प्रसार माध्यमांना या कारवाईचे व्हिडिओ दिले. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के.पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करून के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के.पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेट्स ठेवतो. गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे, असे मलिक म्हणाले.

अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणीही मलिक यांनी केली.

- Advertisement -

सध्या गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण आम्ही भानुशालीची हालचाल शोधून काढली. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

तसेच क्रूझवर जे अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले जात आहेत, त्याचे फोटो एनसीबीच्या मुंबईतील कार्यालयात काढले गेले. एनडीपीएस कायद्यानुसार अमली पदार्थ जप्त केल्याच्या ठिकाणीच त्याचा पंचनामा झाला पाहिजे. मग क्रूझवर अमली पदार्थ सापडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचे फोटो किंवा व्हिडिओ का नाही काढले? असा सवालही मलिक यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -