घरमहाराष्ट्रविधानपरिषद निवडणुकीत भाजपचा सहावा उमेदवार; जानकर अडचणीत

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा सहावा उमेदवार; जानकर अडचणीत

Subscribe

भाजपने सहावा उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आता १२ उमेदवार झाले आहेत. ९ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक अटळ आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे आज पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी देण्यामागचे कारण म्हणजे महादेव जानकरांनी यावेळी रासप पक्षाकडून अर्ज सादर केलेला आहे. त्यामुळे जानकरांना संधी दिली जाणार की नाही? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव जानकर यांचे भवितव्य भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हातात असल्याचे कळत आहे. अमित शहा यांनी परवानगी दिली तरच जानकार यांना निवडूण आणले जाईल. अन्यथा भाजपकडून पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहेच, अशी माहिती मिळाली आहे.

पांडुरंग फुंडकरांच्या जागेवर जानकरांची वर्णी?

महादेव जानकरांनी रासपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जानकरांच्या उमेदवारीत अडथळा निर्माण झाला आहे. महादेव जानकरांना भाजपच्या कोट्यातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. मात्र जानकरांनी रासप पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी भाजपने पृथ्वीराज देशमुख यांना शेवटच्या क्षणी सहावा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर जानकरांना पुढील महिन्यात संधी देणार असल्याचा विचार भाजपमध्ये सुरु आहे.

- Advertisement -

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे निवडणूकीची रंगत वाढली आहे. आज भाजपाकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील आणि निलय नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.

शिवसेनेचे उमेदवार अॅड. अनिल परब आणि मनिषा कायंदे यांच्यासह, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची तुर्तास तरी शक्यता नाही. उद्या ६ जुलैला अर्जांची छाननी करण्यात येईल. ९ जुलै रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा १६ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -