घरमहाराष्ट्रनागपूरBSP Campaign : मायावतींच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात उत्तर प्रदेशऐवजी नागपूरमधून का?

BSP Campaign : मायावतींच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात उत्तर प्रदेशऐवजी नागपूरमधून का?

Subscribe

नागपूर – बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी गुरुवारी सायंकाळी नागपूरमधून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. येथील इंदौरी बेजनबाग मैदानावर मायावती यांची 2024 च्या लोकसभा निवडणुकीची पहिली जाहीर सभा झाली. मायावतींच्या पक्षाला उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशनंतर महाराष्ट्रातच जनाधार मिळालेला आहे. मात्र गेल्या काही निवडणुकांपासून बसपाला पराभवाचा सामना करावा लागत आहे.

बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशात एकट्याच्या बळावर निवडणूक लढवत आहे. 2019 मध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेससोबत त्यांची आघाडी होती, मात्र यंदा पुन्हा एकदा 2014 प्रमाणे ‘एकला चलो रे’चा नारा मायावतींनी दिला आहे. उत्तर प्रदेशच्या चारवेळा मुख्यमंत्री राहिले्लया मायावती यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात उत्तर प्रदेश ऐवजी महाराष्ट्रातून का केली असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

नागपूरमधील सभेच्या माध्यमातून कोअर व्होटरला थेट संदेश

नागपूर हे देशातील दलित राजकारणाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरमध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. दलितांना या देशात इतर धर्मियांप्रमाणेच समान अधिकार मिळाले पाहिजे यासाठीचा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लढत होते. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, कायदेशीर आणि रस्त्यावरील लढाई लढली. या सर्वांचा परिपाक म्हणजे त्यांनी त्यांच्या लाखो अनुयायांना समानतेचा हक्क देणारा बौद्ध धम्म दिला, तो नागपूरमध्ये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याच सिद्धांतावर पुढे कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली आणि बाबासाहेबांचाच संदेश घेऊन ते देशातील गावागावात गेले, आणि दलित व्होट बँक तयार केली. मायावती आणि बसपासाठी हीच दलित व्होट बँक मोठा आधार आहे. मात्र कांशीराम यांच्यानंतर आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह देशात या व्होट बँकेला भाजपाने मोठे खिंडार पाडले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये पहिली प्रचार सभा घेऊन मायावती या व्होट बँकेला पुन्हा एकदा एका छताखाली आणण्याचा प्रयत्न आहेत असे दिसते.

हेही वाचा : निळा झेंडा सगळ्यांसोबत, उमेदवार किती?

- Advertisement -

हिंदूत्वाच्या राजकारणामध्ये दलित मतांना कायम ठेवण्याचा प्रयत्न

देशातील मागील काही वर्षांतील निवडणुका पाहिल्या तर दलित मते एकगठ्ठा भाजपला गेली आहेत. मग ती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक असेल किंवा 2019 ची लोकसभा निवडणूक. मायावती यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून आरोप होत आहे की त्यांनी संपूर्ण दलित मतदारांवरील फोकस हटवला आहे आणि फक्त जाटव समाजावरच त्यांनी लक्षकेंद्रीत केले आहे. एक काळ होता की मायावती यांच्या एका हाकेवर देशातील बहुतांश दलित मतदार हा बसपाला मतदान करत होता. तोच काळ पुन्हा आणण्यासाठी मायावतींनी उत्तर प्रदेशमधून बाहेर पडत पुन्हा एकदा स्वतःला राष्ट्रीय स्तरावर स्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या सभेसाठी नागपूरची निवड केलेली दिसत आहे.

काँग्रेस आणि भाजपला पर्याय असणारी बसपा आज अडगळीत

एक काळ होता जेव्हा काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांना पर्याय म्हणून बहुजन समाज पार्टीकडे पाहिले जात होते. 1990 ते 2000 या दशकात अनेक राज्यात बसपाचा विस्तार झालेला होता. देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये चार वेळा स्वतः मायावती मुख्यमंत्री राहिल्या होत्या. उत्तर प्रदेशसह राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्रात बसपाचा दबदबा होता. या राज्यांमध्ये पक्षाचे उमेदवार निवडणुकीचे समीकरण बदलून टाकण्याऐवढे प्रभावी ठरत होते. मात्र 2014 नंतर हिंदूत्वाचे राजकारण देशात सुरु झाले आणि त्याचा सर्वाधिक फटका बसपा आणि पक्षाच्या सर्वेसर्वा मायावतींना बसला. दलित मतदार हा पक्षापासून दूर होत थेट भाजपकडे वळाला. याच मतदाराला पुन्हा एकदा निळ्या झेंड्याखाली आणण्यासाठी मायावतींनी लोकसभा निवडणुकीची पहिली सभा नागपूरमध्ये घेतली असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : वंचितची पाचवी यादी जाहीर, मुंबईतील तीन जागांचा समावेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -