घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले आहे. सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सीमा देव यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘चित्रपट सृष्टीत अभिनयाच्या जोरावर आणि प्रेमळ स्वभावाने आदराचे स्थान पटकावणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्री सीमा देव यांचे निधन चटका लावून जाणारे आहे, अशा दुःखद भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘भारतीय चित्रपट सृष्टीत रमेश देव आणि सीमा देव यांनी आगळी ओळख निर्माण केली होती. पडद्यावर आणि प्रत्यक्षातही आदर्श दाम्पत्य, प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचे अनेकांशी स्नेहाचे संबंध राहीले आहेत. देव कुटुंबीय गेली कित्येक दशके कला क्षेत्राची सेवा करत आहे. सीमा देव यांनी अनेक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण व्यक्तीरेखा साकारून आपल्या चतुरस्त्र अभिनयाचा परिचय दिला आहे. त्यांच्या जाण्याने देव कुटुंबीय आणि चाहत्यांवर आघात झाला आहे. त्यांना यातून सावरण्याची ताकद मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली,’ असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Seema Dev : ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव काळाच्या पडद्याआड, 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

सीमाताईंच्या जाण्याने सिनेमा जगतातील एका पर्वाचा अंत

ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. सीमा देव यांचा गाजलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपट, एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला, सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटले, “ज्येष्ठ अभिनेत्री सीमाताई देव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. गाजलेल्या ‘आनंद’ चित्रपटातील त्यांची संस्मरणीय भूमिका असो किंवा अनेक मराठी चित्रपट, एक मोठा कालखंड त्यांनी गाजवला. गेल्याचवर्षी रमेश देव आपल्यातून निघून गेले आणि आज सीमाताई! ‘ब्लॅक अँड व्हाईट’ सिनेमात अभिनयाचे रंग भरणारी अभिनेत्री आज आपल्यातून निघून गेली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगाच्या त्या साक्षीदार होत्या. यशाची शिखरे चढूनही त्यांच्यात असलेला नम्र भाव उल्लेखनीय होता. सीमाताई देव यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. रमेश देव आणि सीमाताई देव हे केवळ त्यांच्या जीवनातील नाही तर पडद्यावरचे सुद्धा समीकरण होते. एक मोठा कालखंड या दोघांनी गाजविला. सीमाताईंच्या जाण्याने सिनेमा जगतातील एका अध्यायाची अखेर आहे. मी सीमाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”

हेही वाचा – उपेंद्र लिमये यांच्या ‘रोप’ चित्रपटाचा दगडूशेठ गणपती मंदिरात भव्य मुहूर्त सोहळा संपन्न

सुवर्णयुगाचा अंत – अजित पवार 

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांच्या निधनानं मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगाचा अंत झाला आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. अजित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटले, “आपल्या सहज, सोज्ज्वळ, सात्विक अभिनयानं चित्रपटरसिकांच्या हृदयावर तब्बल सहा दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या गुणी अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत. गेल्यावर्षी, २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर दीड वर्षांनी आज, सीमा देव यांचं झालेलं निधन ही देशभरातील चित्रपटरसिकांच्या, मराठी माणसाच्या मनाला धक्का देणारी घटना आहे. सीमा आणि रमेश देव ही जोडी रुपेरी पडद्यावरची आणि वास्तव जीवनातीलही पती-पत्नींची आदर्श जोडी होती. या जोडीकडे पाहत मागच्या पिढ्यातील अनेक दांपत्यांनी आपलं जीवन सुखी, समाधानी, आनंदी करण्याचा प्रयत्न केला. सीमा देव यांचं निधन ही मराठी चित्रपटसृष्टीची, भारतातील कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी सीमा देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -