Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर; माहिम अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर पहिली...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर; माहिम अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर पहिली भेट

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहोचले आहेत.

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांतील राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची ही शिवतीर्थावरील तिसरी भेट आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज यांची पत्नी शर्मिला ठाकरे, पुत्र अमित ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत महिममध्ये समुद्रात तयार झालेल्या अनधिकृत बांधकामाचा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला होता. यावेळी त्यांनी सरकारने हे अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे असेही सांगितले होते. त्यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत सरकारने मुंबई महानगरपालिकेला तसे निर्देश देऊन हे अनधिकृत बांधकाम हटवले होते. त्यानंतर या दोघांमध्ये ही सदिच्छा भेट होत असल्याने या भेटीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर ठरणार राजकारणाचे केंद्र; मविआच्या सभे पाठोपाठ शिंदेंची धनुष्यबाण यात्रा

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) नुकताच पाडवा मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव आणि चिन्हावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही टोला लगावला होता. शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार यावरुन निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे गटाचे युक्तीवाद सुरु होते. पक्ष आणि चिन्हाबद्दल दावे आणि प्रतिदावे बघून खूप त्रास झाला, असं राज ठाकरे म्हणाले होते. शिवसेनेचा तो धनुष्यबाण नाही तर शिवधनुष्य आहे. एकाला पेलला नाही, आणि दुसऱ्याला पेलवेल की नाही माहित नाही म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला होता.

उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानात सभा झाल्यानतंर एकनाथ शिंदे यांनीही त्याच मैदानात सभा घेऊन शक्तीप्रदर्शन केले, याचाही राज यांनी पाडवा मेळाव्यात समाचार घेतला होता. उद्धव ठाकरे यांच्या मागे मागे जात सभा घेत फिरु नका, असा सल्ला राज यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. सभा – संमेलने घेण्यात वेळ वाया घालण्यापेक्षा राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या, असेही राज यांनी एकनाथ शिंदे यांना या मेळाव्याच्या माध्यमातून सांगितले होते.

मुंबईच्या सुशोभिकरणावरुनही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावले होते. मुंबईत केलेली विद्युत रोषणाई पाहिली की, मुंबईत आलो की डान्सबारमध्ये आलो, असा प्रश्न पडतो असं राज ठाकरे म्हणाले होते.
पाडवा मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज यांची ही पहिली भेट आहे. मुख्यमंत्री सहकुटुंब राज यांच्या भेटीसाठी आले आहेत. गुढीपाडवा शोभायात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या डोंबिवली मध्यवर्ती कार्यालयालाही भेट दिली होती. यावेळी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले होते. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि मनसे युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर आमदार राजू पाटील यांनी या संबंधीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतली असे म्हटले होते.

- Advertisment -