घरठाणेबालमावळ्यांकडून ठाण्यात 'किल्ले सर', की-पॅडवरील बोटांना चिखल लागल्याची तक्रार नाही

बालमावळ्यांकडून ठाण्यात ‘किल्ले सर’, की-पॅडवरील बोटांना चिखल लागल्याची तक्रार नाही

Subscribe

ठाणे : महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची महती आणि माहिती लहान मुलांना व्हावी म्हणून दिवाळीच्या सुट्टीत किल्ले बांधण्याची प्रथा आहे. मुंबईसह ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात दिवाळीनिमित्त अनेक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या जातात. गेल्या काही वर्षांत गडकिल्ले बनवण्यासाठी पालकांनीच निरुत्साह दाखवल्याने लहान मुलांनीही यात रस दाखवला नव्हता. मात्र, कोरोनानंतरच्या दिवाळीत यंदा गड-किल्ले बनवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी लहानग्यांसह मोठमोठ्या मंडळांकडून मातीचे किल्ले बनवले जातात. मंडळांच्या वरिष्ठांकडून लहान मुलांना यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन दिलं जातं. सर्वात जास्त गडकिल्ले बनवण्यात ठाणे जिल्हा अग्रेसर आहे. ठाणे जिल्ह्यात घोडबंदर किल्ला, माहुली गड, पळस गड, भंडार गड, दुर्गाडी किल्ला, गोरखगड, भैरवगड आणि वेहेळे कोट यांसारखे अनेक गडकिल्ले आहेत. गडकिल्ले हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. म्हणूनच, दिवाळीत गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्यात येत असते.

- Advertisement -

किल्ले बांधण्याचे प्रकार दोन

किल्ले दोन प्रकारे तयार केले जातात. पहिलं म्हणजे दगड, विटा, माती गोळा करून आपल्याला हवा तशा आकाराचा किल्ला बनवता येतो. तर, दुसरीकडे लाकडी किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचा किल्ला तयार केला जातो. विटा रचणे, चिखल मातीने थापणे आणि आकार देणे ही सगळी कलाकुसर किल्ले बनवताना केली जाते. यामध्ये गुहा, बुरुज, महाल अशा बाबींचा देखील समावेश असतो. पण आता रेडीमेड किल्ले बाजारात सहज उपलब्ध झाले आहेत. प्लास्टिकचे सैन्य त्यात बसवले जाऊ लागले आहेत.

- Advertisement -

किल्ले बनवण्याची मजा झाली इतिहासजमा

किल्ले बनवताना केवळ महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीची माहितीच मुलांना मिळत नव्हती तर एकत्र येऊन काम कसं करावं, नियोजन कसं करावं याचाही प्रत्यक्ष अनुभव मिळत होता. मात्र, एकत्र येऊन किल्ले बनवण्याची मजा गेल्या काही वर्षांपासून मागे पडली होती. पालकांकडून याबाबत मुलांना प्रोत्साहन मिळत नव्हते. मात्र, कोरोनानंतरच्या काळात गड किल्ल्यांच्या बांधणीत मुलांनी चांगला सहभाग नोंदवला आहे. अनेक ठिकाणी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी किल्ले स्पर्धा भरवण्यात येतात. या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत असून पुन्हा एकदा गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याची प्रथा जोपासली जात आहे.

मी गेल्या अनेक वर्षांपासून किल्ले बनवण्याचे काम करतो. ठाण्यात स्थायिक झाल्यानंतर मला किल्ले बनवण्याची प्रचंड आवड निर्माण झाली. तसेच शिवसाई मित्रमंडळाच्या माध्यमातून मी मातीचे किंवा ब्लॉकचे किल्ले कसे बनवायचे असतात याची सर्व माहिती आणि ज्ञान मी आमच्या परिसरातील सर्व लहान मुलांना देत होतो. किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण केलेली एक संधी आहे.

– दत्तात्रय कुंभार सदस्य, शिवसाई मित्र मंडळ, ठाणे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -