घरमहाराष्ट्रभंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले...

भंडाऱ्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले…

Subscribe

भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. भंडाऱ्यात होणारा हा कार्यक्रम 18 असून शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे आजपर्यंत 1 कोटी 84 लाख लोकांना फायदा मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लोकांचे राहणीमान उंचावले आहे. या कार्यक्रमामुळे लोकांना मोठा फायदा झाला आहे. त्याशिवाय अशा प्रकारचे कार्यक्रम घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची माहिती देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली. डेंग्यू आजारातून बरे झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बऱ्याच दिवसांनी शासनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (CM Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray from program ‘Shasan Aplya Dari’ held at Bhandara)

हेही वाचा – शासन आपल्या दारी : अजित पवारांच्या भाषणात गोंधळ; नेमकं काय झालं?

- Advertisement -

भंडाऱ्यातील आजच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या ज्या योजना आहेत, त्या सर्व योजना राबवायच्या आहेत. पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यामुळे 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसाठी आपणही कमीत कमी 1 ट्रिलियन डॉलरचे योगदान दिले पाहिजे. ज्याप्रमाणे आत्मनिर्भर देश होणार आहे. त्याचप्रमाणे आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली राज्य बनवायचे आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपल्याला काम करायचे आहे.

तसेच, राजकारण करायला खूप वेळ आहे. संधीही खूप असते. परंतु, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम ज्या पद्धतीने यशस्वी होत आहे. त्यासाठी हजारो लोकांचा प्रतिसाद लाभत आहे. कारण इथे सरकार तुमच्या दारी आलेले आहे. हे सरकार घरी बसणारे सरकार नाही तर तुमच्या दारी येऊन तुम्हाला मदत करणारे सरकार आहे, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला आहे. तर, मोठ्या संख्येने नागरिक येथे येत असतात. इतक्या मोठ्या संख्येने आल्यानंतर नागरिकांना एका छताखाली लाभ देण्याचे काम सरकार करत आहे. याचाच जळफळाट विरोधकांना होत आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली. पण सरकार म्हणून जे काम करायचे आहे ते काम आम्ही करत राहणार, असेही मुख्यमंत्र्यांकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -