घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातले असते तर कळलं असतं - खर्गे

मुख्यमंत्री शेतकरी कुटुंबातले असते तर कळलं असतं – खर्गे

Subscribe

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा गुरुवारी उदगीर येथून नांदेड जिल्ह्यात जाणार आहे. मुखेड आणि देगलूर येथे जाहीर सभा होणार आहेत.

मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि खासदार मल्लिकार्जून खर्गे यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा आणि दुष्काळ पाहणी दौऱ्याचा प्रारंभ करताना औसा येथील पहिल्या जाहीर सभेत खर्गे बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळत नाही

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीसंदर्भात बोलताना खर्गे यांनी भाजप आणि शिवसेनेवर टीका करत केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. या सरकारच्या काळात महाराष्ट्रात १५ हजार शेतकरी आत्महत्या झाल्या. पण पंतप्रधानांनी कधीही शेतकऱ्यांसाठी राज्यात येऊन त्यांचे दुःख जाणून घेतले नाही. मुख्यमंत्री शेतकरी हिताचा आव आणतात. पण त्यांना साधी नांगरणी, पेरणी, वखरणी, कोळपणी तरी कळते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे दुःख कळत नाही. म्हणूनच महाराष्ट्रात अद्याप दुष्काळ जाहीर झालेला नसल्याची टीका त्यांनी केली.

- Advertisement -

मोदी खोट्यांचे सरदार आहेत

खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही घणाघाती टीका केली. सत्तेत आल्यापासून मोदींनी या देशाला अधोगतीच्या मार्गावर नेले आहे. पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंगपर्यंतच्या पंतप्रधानांनी देशासाठी जे काम केले, त्यावर पाणी फेरण्याचे काम मोदी सरकारच्या काळात सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी आजवर खोटे बोलण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही. विदेशातील काळा पैसा, प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात १५ लाख रूपये, २ कोटी रोजगार अशा अनेक खोट्या घोषणा त्यांनी केल्या. मोदी म्हणजे खोट्यांचे सरदार आहेत. खऱ्यालाही लाज वाटेल इतक्या ठामपणे ते खोटे बोलतात. खोटे बोला पण रेटून बोला, हाच त्यांचा नारा असल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान काँग्रेसची ही जनसंघर्ष यात्रा गुरुवारी उदगीर येथून नांदेड जिल्ह्यात जाणार असून मुखेड आणि देगलूर येथे जाहीर सभा होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -