घरमहाराष्ट्रसंघाच्या कार्यक्रमाला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत - खर्गे

संघाच्या कार्यक्रमाला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत – खर्गे

Subscribe

RSS ने पुढील महिन्यात 'भविष्य का भारत' कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधींना निमंत्रण पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आरएसएसच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, ‘राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अन्य कुणीही नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्जे यांनी दिली. याविषयी आपले मत मांडतेवेळी खर्जे म्हणाले, की ”संबंधित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आरएसएसकडून राहुल गांधी यांना अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही. याशिवाय हे निमंत्रण आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाठवण्यात आले आहे. मात्र, काहीही असले तरी राहुल गांधी किंवा काँग्रेसचे अन्य कोणतेच नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

भाजप सरकारवर निशाणा साधत खर्जे म्हणाले, ”भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढवून सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करत आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात समाजसुधारकांच्या हत्या करणारे मोकाट आहेत. सरकारी यंत्रणेकडून पुरोगामी विचारांच्या लोकांच्या मानवी हक्कांचे हनन सुरू आहे. सरकारविरोधात बोलणा-यांवर दडपशाही केली जाते आहे. त्यांना नक्षलवादी, राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे.” खर्जे पुढे म्हणाले, ”राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विखारी विचारधारेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. काँग्रेस पक्षाने देशात जातीयवाद, धर्मांधता पसरवणा-या या विचारधारेचा नेहमीच विरोध केला आहे.” ”ज्यांनी स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष तिरंग्याला राष्ट्रध्वज मानले नाही, ते आज आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत”, असा टोला खर्जेंनी लगावला.

- Advertisement -

दरम्यान आरएसएसने पुढील महिन्यात ‘भविष्य का भारत’ कार्यक्रमाचं आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी आरएसएसकडून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माकपाचे नेते सीताराम येचुरी यांना निमंत्रण पाठवल्याचे वृत्त समोर आले आहे. आरएसएसचा हा कार्यक्रम १७ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत चालणार आहे. आता राहुल गांधींकडून यावर काही उत्तर येणार का? याची सर्वांना प्रतिक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -