घरमहाराष्ट्रदेशातल्या प्राणीसंग्रहालयांना करोना अलर्ट

देशातल्या प्राणीसंग्रहालयांना करोना अलर्ट

Subscribe

आता प्राण्यांनाही करोनाची भीती

करोनाची भीती आता माणसाप्रमाणे प्राण्यांनाही आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ब्राँक्स प्राणीसंग्रहालयातील एका वाघाला करोना झाल्याचे उघड झाल्यानंतर भारताच्या केंद्रीय प्राणीसंग्रहालयाने देशातील सर्व प्राणीसंग्रहालयांना ‘करोना अलर्ट’ केले आहे. वाघांसहीत सर्व मांसाहारी प्राणांना २४ तास देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्यूयॉर्कच्या प्राणीसंग्रहालयातील वाघामध्ये करोनाचे विषाणू आढळल्याचे अमेरिकेकडून अधिकृतरित्या रविवारी जाहीर करण्यात आले. त्यानंतर, सोमवारी भारतातील सर्व प्राणीसंग्रहालयांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्राणीसंग्रहालयांना ‘हाय अलर्ट’ देण्यात आला आहे. वाघ इतर प्राण्यांची तसेच सस्तन प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. संशयास्पद प्राण्यांचे नमुने प्राणी आरोग्य संस्थेकडे दर पंधरा दिवसांनी पाठवावे, अशा सूचना देतानाच भोपाळ, हिसार आणि बरेली येथील संस्थांकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने म्हटले आहे.

- Advertisement -

प्राणीसंग्रहालयांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी वैयक्तिक स्वच्छतेची संपूर्ण काळजी घ्यावी. प्राणीसंग्रहालयांनी सातत्याने शासनाच्या त्या त्या ठिकाणच्या नोडल संस्थेच्या नियमित संपर्कात राहावे, असेही प्राधिकरणाने दिलेल्या सूचनांमध्ये म्हटले आहे. सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे प्राण्यांवर आणि त्यांच्या वर्तनावर २४ तास लक्ष ठेवले जावे. प्राण्यांची देखभाल करणार्‍या कर्मचार्‍यांनी सुरक्षेची सर्व खबरदारी घेतल्याशिवाय त्यांना कामाची परवानगी देऊ नये. प्राण्यांना खाऊ घालताना माणसांचा कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घ्यावी. आजारी प्राण्यांचे तातडीने विलगीकरण केले जावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -