विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचे आधुनिक शैक्षणिक धोरण : दीपक केसरकर

deepak Kesarkar

 

मुंबईः  विद्यार्थ्यांचा फक्त शैक्षणिक नव्हे तर सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी सरकारने आधुनिक शैक्षणिक धोरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधनावर भर दिला आहे. सर्व प्रकारचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचाही प्रारंभ आता होत आहे. त्यासोबतच, विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी आता पुढील वर्षापासून ‘सेलिब्रिटी स्कूल’ सुरु करण्याचे नियोजित आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘इंद्रधनुष्य २०२३’ हा कला आणि क्रीडा आविष्कारांचा  सांस्कृतिक सोहळा रविवारी वरळीतील राष्ट्रीय क्रीडा संकुलातील सरदार वल्लभाई पटेल डोम स्टेडियम येथे संपन्न झाला. या सोहळ्यात २ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध कला आणि क्रीडा प्रकारांचे सादरीकरण केले. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते.

आपल्या मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कर्तबगारी दाखवून नेतृत्व करण्याची संधी मिळेल, इतकं सामर्थ्य त्यांच्यामध्ये निश्चित आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात नवीन शैक्षणिक धोरण आता राबविण्यात येत आहे. या धोरणानुसार विद्यार्थ्यांना मातृभाषेतून उच्च व तंत्र शिक्षणासह इतरही सर्व प्रकारचे शिक्षण घेता येणार आहे. यामुळे शाळांमध्ये पटसंख्या वाढून विद्यार्थ्यांचा ओघ वाढणार आहे. मराठी मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे, असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘सेलिब्रिटी स्कुल’ सुरू करणार
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून ‘सेलिब्रिटी स्कुल’ सुरू करण्यात येणार आहेत. यात वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ (सेलिब्रिटी) इंटरनेटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना गायन, नृत्य, वक्तृत्व आदी कला शिकवतील. त्यानंतर स्पर्धा घेवून पहिल्या १ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विविध क्षेत्रांमध्ये पारंगत असलेले सेलिब्रिटी या १ हजार विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण देतील, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.

इंद्रधनुष्य २०२३’ सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांकडून विविध प्रकाराचे आविष्कार सादर
‘इंद्रधनुष्य २०२३’ सोहळ्यामध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या शाळांमधील मिळून सुमारे २,१०० विद्यार्थ्यांनी १५ प्रकाराचे आविष्कार सादर केले. संचलन मानवंदनेने प्रारंभ झाल्यानंतर वाद्यवृंद वादन, विशेष विद्यार्थ्यांचे नाटक सादरीकरण, तालबद्ध (रिदमिक) योगासने, स्वरलता आदरांजली गीते, फ्रोलिक्स, एरोबिक्स रिंग, नृत्य नाटिका (बॅले), त्रिपुरा राज्यातील होजागिरी लोकनृत्य, मानवी मनोरे, महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारे लेझीम नृत्य, तालबद्ध (रिदमिक) बास्केटबॉल, जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी मिळून चितारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती, आझादी ७५ हे सूर व नृत्य यांचा संगम असणारे सादरीकरण, मिले सूर मेरा तुम्हारा आणि अखेरीस इंद्रधनुष्य शीर्षक गीत असे एकापाठोपाठ कला, क्रीडा प्रकार सादर करीत महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपण कोणत्याही स्पर्धेत मागे नाही, हे सिद्ध तर केलेच आणि उपस्थितांना अक्षरशः खिळवून ठेवले.