घरमहाराष्ट्रपुणेकसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचार यादीतून फडणवीसांना डच्चू

कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचार यादीतून फडणवीसांना डच्चू

Subscribe

काही दिवसांत होणाऱ्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकासकडून तयारी पूर्ण झाली आहे. अशातच आता या निवडणुकीचा प्रचार करणाऱ्या स्टार प्रचारकांची यादी भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे. पण यामधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना डच्चू देण्यात आला आहे.

कसबा पेठ विधानसभेच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यामुळे या दोन्ही मतदारसंघामध्ये पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी भाजपने कसबा पेठ विधानसभेतून हेमंत रासने तर चिंचवड विधानसभेतून अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी आता भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना या पोटनिवडणुकीत प्रचार करणाऱ्या 40 स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. महत्वाची बाब म्हणजे या प्रचारामधून देवेंद्र फडणवीस यांचे नाव वगळण्यात आले आहे.

भाजपकडून मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आलेल्या यादीमध्ये केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून स्टार प्रचारकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे-पाटील, केंद्रीय राज्य मंत्री भागवत कराड, माजी मंत्री आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कसबा पोटनिवडणुकीचे प्रभारी आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, खासदार गिरीश बापट, खासदार धनंजय महाडिक, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, हरयाणाचे प्रभारी विनोद तावडे, आमदार श्रीकांत भारतीय आणि सुनील कर्जतकर या नेत्यांचा सहभाग करण्यात आला आहे. हे सर्व स्टार प्रचारक भाजपच्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडीकडून देखील या पोटनिवडणुकींचा जोरदार प्रचार करण्यात येणार आहे. कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही विधानसभेत मविआमधील घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचा उमेदवार नसला तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे सभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि नाना पटोले येणार आहेत.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील एकाच मंचावर; गांधी विचारांवरून फडणवीसांचा काँग्रेसवर टीका

- Advertisement -

तर चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नाना काटे यांच्या प्रचारासाठी आमदार सुनील शेळके, आमदार अण्णा बनसोडे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे स्वतः प्रचार करणार आहेत. दरम्यान, दोन्ही मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार नसला तरी, ठाकरे गटातील नेते देखील या प्रचारासाठी येणार असल्याची माहिती याआधी अजित पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने या दोन्ही विधानसभेसाठी उमेदवारांची निवड केल्यानंतर शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. ज्यामुळे या निवडणुकीची आता अधिकच चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी करण्यात येणा-या प्रचारामधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वगळण्यात आले आहे. पण तरी सुद्धा फडणवीस या मतदारसंघामध्ये प्रचाराला येतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -