घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे? त्या घटनेमुळे मंत्रिपद हुकणार?

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी धनंजय मुंडे? त्या घटनेमुळे मंत्रिपद हुकणार?

Subscribe

राज्यमंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा समावेश झाल्यामुळे रिक्त होणाऱ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची नियुक्ती निश्चित झाल्याचे समजते. प्रभावी वक्तृत्व आणि तरूणांवर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व असल्यामुळे पक्षवाढीसाठी तेच योग्य असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिली आहे.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या कामगिरीची पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी दखल घेतली आहे. सध्या पक्षामध्ये तरूण नेतृत्त्व, सोशल मीडियावर पकड आणि ग्रामीण महाराष्ट्राशी थेट नाळ जोडलेले नेते मंत्रीमंडळात जात असल्याने स्वतः पवार यांनीच मुंडेंच्या नावावर मोहोर उमटवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत पवारांनी पक्षातील ज्येष्ठ आणि जुन्याजाणत्या नेत्यांचे मत जाणून घेतले आहे. त्यांनीही मुंडेंच्या नावाला पसंती दिली. पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मात्र, मुंडेंच्या नावाला विरोध केला आहे. शरद पवारांच्या भूमिकेला छेद देणारे कृत्य केल्याचा राग पक्षातील निष्ठावंत नेत्यांच्या मनात कायम असल्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यासच नव्हे तर प्रदेशाध्यक्षपद देण्यासही विरोध आहे. पक्षाशी खासकरून शरद पवारांशी गद्दारी करणाऱ्या नेत्यास मंत्रिपद अथवा प्रदेशाध्यक्ष दिल्या संघटना पातळीवर चुकीचा संदेश जाईल अशी या नेत्यांना भीती वाटत आहे.

- Advertisement -

हे वाचा – राष्ट्रवादीकडून आदिती नलावडे, शिवाजीराव गर्जे विधानपरिषदेवर

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शरद पवार हे जीवाचे रान करत होते. शिवसेनेसारख्या हिंदुत्त्ववादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस द्विधा मनस्थितीत होती. त्यावेळी शिवसेनेसोबत सरकार बनविणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व पवार हे काँग्रेस हायकमांडच्या गळी उतरवत होते. असे असतानाही धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून २३ नोव्हेंबर रोजी आमदार राज्यपाल भवनात फडणवीस-अजितदादा यांच्या मुलाखतीसाठी गेले होते. महा विकास आघाडीची चर्चा पुढे जात असताना अजित पवार आणि मुंडे यांच्या कृतीमुळे पवारांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे पवारांच्या प्रतिमेला धक्का देण्याचे काम केलेल्यांना मानाचे पान दिले जाऊ नये, तरच पक्षात योग्य संदेश जाईल, असे राष्ट्रवादीतील निष्ठावंत नेत्यांचे म्हणणे आहे.

भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होते. या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी शरद पवारच होते. उद्धव ठाकरे यांच्यावर नावावर तीन्ही पक्षाचे एकमत झाल्याचे खुद्द पवारांनीच जाहीर केले होते. असे असतानाही त्याच रात्री धनंजय मुंडे यांनी पक्षनेतृत्त्वाच्या भूमिकेशी प्रतारणा करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसविण्यासाठी सगळी सूत्रे आपल्या बंगल्यावरून हलवत होते. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा मुंडेंना आपल्या मंत्रिमंडळात घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. मुंडेंसारखा घरभेदी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात नसावा, अशा भावना शिवसेनेच्या आमदारांनी खासगीत व्यक्त केल्या आहेत. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २३ किंवा २४ तारखेला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे.


हे वाचा – एका हिंदू शेड्यूल्ड कास्ट भक्ताची गोष्ट

एक प्रतिक्रिया

  1. हे उद्योग प्रसारमाध्यमांनी बंद करावेत.. राष्ट्रवादी देईल ती जबाबदारी मा.धनंजयजी मूंडे साहेब पेलतील पण आयत्या भाकरी खाऊन बंद रूम मधून तुम्ही जे दिवसरात्र गरळ ओकता ती केवळ जनसामान्यांच्याच नव्हे तर लोकशाहीच्या ही सशक्तीकरणासाठी घातक आहे …?
    निषेध तूमच्या बोगस विचारांचा ?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -