घरमहाराष्ट्रशिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल असं काम करू नका, रामदास कदमांचा इशारा नेमका...

शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल असं काम करू नका, रामदास कदमांचा इशारा नेमका कोणाकडे?

Subscribe

माननीय शिवसेनाप्रमुखांनी जी जी जबाबदारी दिली. ती चोखपणे पार पाडण्याचं काम मी केलंय. 1996 मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री, 1997 मध्ये गृहराज्यमंत्री, 2004मध्ये विरोधी पक्षनेता, 2014 मध्ये पर्यावरण मंत्री जी जी जबाबदारी पक्षानं दिली ती मी पार पाडली. ज्या ज्या वेळेला मी हात वरती केला, त्या त्या वेळेला आपण मला संधी दिली. बोलण्याची, माझे विचार मांडण्याची मला संधी दिलीत. म्हणून मी आपले आभार मानतो. माझ्या कोकणात सिंचनाची व्यवस्था आहे, ती स्वातंत्र्यानंतर फक्त दीड टक्का आहे.

मुंबईः गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. रामदास कदमांनी आक्रमक होत अनिल परबांना थेट शिंगावर घेतलं होतं. पण आता त्याच रामदास कदमांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशीच विधान परिषदेच्या सभागृहात त्यांनी भाषण करत अनेकांना टोले लगावलेत.

पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, म्हणून मी सांगतोय शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम करू नका, असं म्हणत रामदास कदमांनी कोणाचंही नाव न घेता स्वकीयांनाही घरचा आहेर दिलाय. अनेकांचे पत्ते कट होत असतात, पण मी स्वतः आता निवृत्ती घेतोय. माझा मुलगा आमदार आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी संधी दिली. राष्ट्रवादीचा आमदार असतानाही त्याला पाडून मी मुलाला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमदार केलं. आज तो देखील आमदार आहे, मी पूर्ण समाधानी आहे. कुठलंही दुःख माझ्या मनात अजिबात नाही. माझ्यानंतर उद्धवला साथ द्या हे शब्द बाळासाहेबांचे होते. म्हणून मी सांगतोय शिवसेनाप्रमुखांच्या आत्म्याला दुःख होईल, असं कुठलंही काम करू नका, असंही रामदास कदमांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनापासून मी आभार मानतो. पक्षामुळे व्यक्ती मोठी होते, व्यक्तीमुळे पक्ष नाही, याचा अनुभव मी गेल्या अनेक वर्षांपासून घेतलाय. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्यानं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेला जन्म दिला. मी 1970 साली शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली, जवळजवळ 52 वर्षे झालीत. एक शिवसैनिक, गटप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, आमदार, नामदार झालो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. 40 ते 50 वर्षे शिवसेनाप्रमुखांच्या सान्निध्यात मला काम करण्याची संधी मिळाली. म्हणून खेडमधून मी सलग चार वर्षे विधानसभेला निवडून आलो. 20 वर्षे मी विधानसभेत बसलो, असंही रामदास कदमांनी सांगितलंय.

माननीय शिवसेनाप्रमुखांनी जी जी जबाबदारी दिली. ती चोखपणे पार पाडण्याचं काम मी केलंय. 1996 मध्ये अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री, 1997 मध्ये गृहराज्यमंत्री, 2004मध्ये विरोधी पक्षनेता, 2014 मध्ये पर्यावरण मंत्री जी जी जबाबदारी पक्षानं दिली ती मी पार पाडली. ज्या ज्या वेळेला मी हात वरती केला, त्या त्या वेळेला आपण मला संधी दिली. बोलण्याची, माझे विचार मांडण्याची मला संधी दिलीत. म्हणून मी आपले आभार मानतो. माझ्या कोकणात सिंचनाची व्यवस्था आहे, ती स्वातंत्र्यानंतर फक्त दीड टक्का आहे. मी अनेक वेळेला प्रयत्न केले. मंत्री असताना हा विषय मी कॅबिनेटमध्ये लावून धरला. मला त्यात यश मिळालं नाही. सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये आणि सर्वात जास्त अन्यायही कोकणावरतीच झाला. पश्चिम महाराष्ट्रात सिंचनाचा टक्का 55 आहे. या सभागृहाच्या माध्यमातून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा मी करतो, अशी मागणीही रामदास कदम यांनी केलीय.

- Advertisement -

कोकण वैज्ञानिक विकास महामंडळ सर्व बरखास्त झालंय. त्या सगळ्या फाईल मी आणल्यात, त्या आपल्याकडे देणार आहे. कोकणासाठीसुद्धा वैज्ञानिक विकास महामंडळ झालं, तर कोणाचं भलं होईल. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हावेत अशी माझी इच्छा आहे. मला पक्षानं पुष्कळ दिलं, त्याबद्दल मी अधिक बोलणार नाही. कधी कधी कुटुंबामध्ये भांड्याला भांड लागत असतं. त्याचा विपर्यास करण्याची काही कारणं नाहीत. मतभेद थोडेसे होतात. पण ते तात्पुरते असतात. माझा स्वभाव तसाच आहे, थोडासा भडक कधी कधी चिडतो. पक्षामध्ये अनेक ठिकाणी संघर्ष केला, ज्या ज्या ठिकाणी दंगली झाल्या तिथे मी पोहोचलोय. माथाडी कामगारांसाठी काम केलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमध्येही मी निवडणूक लढलेलो आहे. अनेकांचे पत्ते कट होत असतात, पण मी स्वतः आता निवृत्ती घेतोय. माझा मुलगा आमदार आहे, त्याला उद्धव ठाकरेंनी संधी दिली. राष्ट्रवादीचा आमदार असतानाही त्याला पाडून मी त्याला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आमदार केलं. आज तो देखील आमदार आहे, मी पूर्ण समाधानी आहे. कुठलंही दुःख माझ्या मनात अजिबात नाही, असंही ते शेवटी म्हणालेत.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -