खेळ कुणाला अपक्षांचा कळला!

राज्यसभा निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसतानाही तीन जागा जिंकल्याने आत्मविश्वास बळावलेल्या भाजपने सोमवारी होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच उमेदवार उभे करून महाविकास आघाडीला पुन्हा आव्हान दिलं आहे.

राज्यसभा निवडणुकीत पुरेसं संख्याबळ नसतानाही तीन जागा जिंकल्याने आत्मविश्वास बळावलेल्या भाजपने सोमवारी होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीत पाच उमेदवार उभे करून महाविकास आघाडीला पुन्हा आव्हान दिलं आहे. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांनी केलेला दगाफटका आणि गुप्त मतदान असल्याने स्वपक्षीय आमदारांच्या मतांचीही फाटाफूट होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीला काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यसभेप्रमाणेच महाविकास आघाडीचा पराभव झाल्यास महाविकास आघाडीचं भवितव्यही धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवानंतर महाविकास आघाडीतच धुसफूस सुरू झाली आहे. त्यातच संजय राऊत यांनी थेट अपक्ष आमदारांची नावे घेत पराभवाचं खापर त्यांच्यावर फोडल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्ष आणि पाठिंबा देणार्‍या अपक्ष आमदारांच्या नाराजीचा शिवसेनेला सामना करावा लागत आहे. महाविकास आघाडीने चारही जागा जिंकण्याची तयारी केली होती. पण, मतदानानंतर काही अपक्षांनी भाजपला मतदान केल्याने संजय पवार यांचा पराभव होऊन पुरेसं संख्याबळ नसतानाही भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले होते. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

संजय राऊत यांच्या कडवट प्रतिक्रियेतून तो दिसून आला आहे. त्यावर अपक्ष दुखावले गेले आहेत. आमदार देवेंद्र भुयार यांनी तर थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यंमत्री अपक्ष आमदारांना भेटतसुध्दा नाहीत. काम संपले की साधी विचारपूसदेखील केली जात नाही. अपक्ष आमदारांवर कायम अविश्वास दाखवणे हे योग्य नाही. अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान केले तरीही आम्हालाच स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. शिवसेनेची ताठर भूमिका राहिल्यास भविष्यात शिवसेनेसोबत राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल, असा थेट इशाराच भुयार यांनी शिवसेनेला दिला आहे.

मी आघाडीलाच मतदान केलेलं असतानाही राऊत उगाच आरोप करत सुटले आहेत. खर्‍या चुका कुणाच्या आहेत, त्या सोडून त्यांनी अन्यत्र हवेत वार करू नयेत, अशी टीका आमदार संजय शिंदे यांनी राऊत यांच्यावर केली आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मतदानाच्या पाच दिवस आधीच आम्हाला कुणीही गृहीत धरू नये, असा इशारा देत उघडपणे नाराजी जाहीर केली होती. त्यानंतरही शिवसेनेकडून त्याची दखल घेतली गेली नाही. ठाकूरांकडे तीन आमदार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. पण, स्थानिक पातळीवर शिवसेनेकडून त्यांचे खच्चीकरण करण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून शिवसेना विरुद्ध बविआ संघर्ष सुरू आहे. पालघर जिल्ह्याची धुरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का

शिवसेनेचे राजेंद्र गावीत पालघरचे खासदार आहेत. पालकमंत्री शिवसेनेचे दादा भुसे आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक आहेत. मात्र, यातील एकाही नेत्याचे ठाकूरांशी चांगले संबंध नाहीत. राज्यसभेच्या निवडणुकीत ठाकूरांची निर्णायक मतं असतानाही यातील एकाही नेत्याने ठाकूरांशी साधा संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोनवरून संपर्क साधून ठाकूरांना फारसं महत्व दिलं नाही. ठाकूरांनी आम्हाला गृहीत धरु नका, असं सांगत दिलेला इशारा त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला धक्का देणारा ठरला. एकीकडे, संजय राऊत अपक्षांवर आगपाखड करत असताना शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी सबुरीची भूमिका घेत राऊत यांचे कान टोचण्याचं काम केलं आहे. राज्यसभेच्या उमेदवारांसाठी झालेलं मतदान हे गुप्त मतदान आहे. त्यामुळे कोणी मतदान केलं, कोणी नाही त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. एखाद्याने मतदान केले नाही या निष्कर्षावरून कोणावर तरी आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं, असं स्पष्ट मत गोर्‍हे यांनी नोंदवून एक बाजू सावरून धरण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे. आम्हाला जेवढ्या मतांची अपेक्षा होती तेवढे मतदान झालेले नाही. हे जरी खरं असलं तरी आम्हाला मिळालेल्या प्रत्येक मताचा आणि पाठिंब्याचा आम्ही आदर करतो, असं म्हणत त्यांनी अपक्षांच्या नाराजीवर पडदा टाकण्याचंही काम केलं आहे.

राज्यसभा निवडणुकीत चमत्कार

शरद पवार यांनी तर देवेंद्र फडणवीस यांचंच कौतुक करत शिवसेनेला यातून धडा घेण्याचाच अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत चमत्कार झाला, हे मान्य केलंच पाहिजे. विविध मार्गांनी माणसं आपलीशी करण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाले, अशा शब्दांत शरद पवार यांनी फडणवीस यांचं कौतुक केले. राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनीही संजय राऊत थोडक्यात बचावले असं सांगत शिवसेनेला इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांशी भेट होऊ शकत नाही. आमदारांची कामे होत नसल्याची, संपर्क साधणेही कठीण असल्याची अपक्षांची नाराजी वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त होत होती. तरीही शिवसेनेचे त्याकडे दुर्लक्ष झाले. सरकारचे प्रमुख व सरकारचे आधार असलेल्या आमदारांमधील संवादाची ही दरी देवेंद्र फडणवीस यांनी हेरून राज्यसभा निवडणुकीत त्याचा राजकीय लाभ उठवत शिवसेनेला चितपट केले. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य दिग्गज नेत्यांची ताकद राज्यसभा निवडणुकीत पणाला लागली असताना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपला मोठे यश मिळवून दिलं.

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षामुळे खंडित झाली. त्याचा फटका अर्थातच सत्ताधारी महाविकास आघाडीलाच बसला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अटकळ बांधली जात होती. पण, तीही शक्यता निष्फळ ठरली असून विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांनी दिलेल्या धक्क्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण, विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने पूर्वीच्या चुका टाळून महाविकास आघाडीला सहा जागा जिंकण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील अनेक आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे मित्र असल्याचं दिसून आलं आहे. तिच खेळी फडणवीस विधान परिषदेत करणार हे नक्की. राज्यसभा निवडणुकीत खरं तर फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पराभवासाठी फिल्डिंग लावली होती. पण, राऊत थोडक्यात बचावल्याने फडणवीस यांचा प्रयत्न असफल झाला. त्यामुळेच राऊतांचा संपात अनावर झाला आहे. पण, संतापाच्या भरात अपक्षांची नाराजी ओढवून घेणं महाविकास आघाडीला घातक ठरू शकतं, याचं भान राऊतांना ठेवण्याची गरज आहे.