घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार हे निश्चित, शिवसेने समोर दोनच पर्याय

उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार हे निश्चित, शिवसेने समोर दोनच पर्याय

Subscribe

सत्ता राखण्यासाठी ठाकरे सरकारपुढे अजूनही दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे ठाकरे सरकार यातील कोणता पर्याय निवडतात याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असून बंडखोर आमदारांमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे निश्चित झालं आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री निवास असलेला वर्षा बंगला सोडला असून ते मातोश्री या त्यांच्या स्वगृही परतले आहेत. मात्र सत्ता राखण्यासाठी ठाकरे सरकारपुढे अजूनही दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामुळे ठाकरे सरकार यातील कोणता पर्याय निवडतात याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे ३७ आणि अपक्ष ९ अश्या ४६ आमदारांनी बंडखोरी केल्याने महाराष्ट्रातील ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. त्यातच दिवसागणिक  एकनाथ  शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांचा आकडाही वाढत आहे. यामुळे यापरिस्थितीतून बाहेर कसे यायचे यामुद्दयावरून महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सातत्याने विचारमंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हद्वारे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना मी तुम्हांला मुख्यमंत्रीपदी नकोय असे समोर येऊन सांगा. माझा राजीनामा तयार आहे. तुम्हीच तो राजभवनात घेऊन जा असे भावनिक आवाहन केले होते. त्यानंतर त्यांनी मविआमधील काँग्रेस, राष्ट्रावादीच्या नेत्यांना मी हवाय पण माझ्याच लोकांना मी नकोय असेही म्हटले. यामुळे मी वर्षा सोडून मातोश्रीवर जात असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर गेले. यावेळी हजारो शिवसैनिक भरल्या डोळ्यांनी उद्धव ठाकरेंना निरोप देण्यासाठी आणि मातोश्रीवर सोडण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. हा भावनिक प्रसंग पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी तरळले. पण एवढे होऊनही एकनाथ शिंदे मात्र मविआतून बाहेर पडण्यावर ठाम आहेत. यामुळे शरद पवार यांनी उद्धव य़ांना एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद देण्याचा सल्ला दिला.

- Advertisement -

मात्र शिंदे यांनी बुधवारी टि्वट केले. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाणे ही अनैसर्गिक युती असल्याचे म्हटले.  यातून बाहेर पडायलाच हवे असेही ते टि्वट मध्ये म्हणाले. तसेच ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केल्याने शिवसैनिकही नाराज आहेत. कारण त्यांची विचारसरणी ही शिवसेनेच्या विचारसरणीच्या विपरित आहेत. असेही शिंदे यांनी म्हटले. यामुळे ठाकरे यांचे भावनिक आवाहन शिंदेनी फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. अशावेळी सत्ता राखण्यासाठी उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रावादीबरोबरची युती तोडून भाजपचे कमळ हातात घेण्याशिवाय पर्याय नाही.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष पूर्ण केली आहे. २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसमोर अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठेवला होता. जो भाजपला मान्य नव्हता. त्याचपार्श्वभूमीवर उद्धव य़ांनी भाजपशी नाते तोडून विरोधी विचारसरणी असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. अशावेळी ठाकरे यांनी भाजपऐवजी भले काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सरकार बनवले. पण त्यांनी मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष पूर्ण केली आहेत. यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपद जरी सोडले तरी राजकीय भाषेत त्याला त्यांचा पराभव मानला जाणार नाही. मुख्यमंत्री बनण्याचे ठाकरेंचे स्वप्न असेही पू्र्ण झाले असून शिंदेच्या बंडखोरीमुळे ठाकरेंपुढे फक्त शिवसेनेला वाचवणे हेच एकमेव आव्हान आहे.

- Advertisement -

यामुळे जर शिवसेनेला राजकारणात आपले वर्चस्व अबाधित ठेवायचे असेल तर त्यांना ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन ठेवता येणार नाही. कारण शिवसेनेची विचारसरणी आणि या दोन पक्षांची विचारसरणी भिन्न आहे. यामुळे शिवसेनेप्रमाणेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चालणाऱ्या भाजपबरोबर जाण्याशिवाय उद्धव यांना पर्याय नाही. यामुळे या राजकीय वादळात ठाकरे कोणत्या दिशेला वळतात हे पाहावे लागणार आहे.

 

 

 

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -