मविआमधून बाहेर पडण्यासाठी अडीच वर्ष का लागावी? सुमित राघवनची पोस्ट चर्चेत

या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता सुमीत राघवनने देखील या संबंधात आपले मत व्यक्त केले आहे

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी उलथापालथ होत आहे. मंगळवारपासून एकामागेएक अश्या अनेक धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत. या सर्व घडामोडींवर राजकीय नेत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता सुमीत राघवनने देखील या संबंधात आपले मत व्यक्त केले आहे.

 सुमीत राघवनने आपल्या ट्विटर अकाउंटवरून या प्रकरणासंबंधीत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एका वृत्तपत्रातला लेख शेअर करत कॅप्शन दिले आहे. यामध्ये सुमीतने लिहिले आहे की, एक साधा प्रश्न. माझ्या सारख्या सामान्य मुंबईकराला जेव्हा कळत होतं ती जे झालं ते योग्य नव्हतं(म.वि.आ) तर मग एकनाथ शिंदे साहेब, तुमच्या सारख्या कट्टर शिवसैनिकाला, जो बाळासाहेबांच्या आणि खासकरून दिघे साहेबांच्या तालमीत तयार झाला आहे, अडीच वर्ष का लागावी हा निर्णय घ्यायला? असा प्रश्न सुमीतने विचारलेला आहे.

सुमीतच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यापैकी एकजण म्हणाला की, “सुमीत भाऊ खूप वैचारिक प्रश्न मांडला आहे. कदाचित तुम्ही पुढे निवडणूक साठी उभे राहणार असे वाटत आहे”. या प्रश्नाला उत्तर देत सुमीन हसून म्हणाला, “अहो वैचारिक प्रश्न विचारला तर मग राजकारणात कसा जाईन?”

यावर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करावी लागत होती आणि ती आम्हाला मान्य नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत. असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले”.