घरमहाराष्ट्रविधानसभा अध्यक्षांची आज निवड

विधानसभा अध्यक्षांची आज निवड

Subscribe

महाराष्ट्र विकास आघाडीने शनिवारी विधानसभेत बहुमताची चाचणी १६९ मतांनी उत्तीर्ण केलेली असताना रविवारी नव्या सरकारला दुसरा सोपा पेपर द्यावा लागणार आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार असून त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेे आहे. तर विधानसभा अध्यक्षासाठी महाराष्ट्र विकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

पटोलेंच्याविरोधात भाजपकडून किसन कथोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष निवडीबरोबरच राज्यपालांचे अभिभाषण आणि विरोधी पक्षनेत्यांची निवडही यावेळी केली जाणार आहे.महाराष्ट्र विकास आघाडीकडून नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष म्हणून अर्ज दाखल करतील, असे शनिवारी सकाळी बाळासाहेब थोरात यांनी जाहीर केले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यासमवेत शनिवारी अर्ज दाखल केला.

- Advertisement -

मात्र नवनियुक्त हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग करीत त्यांचे आरोप फेटाळून लावले. फडणवीस यांनी यावेळी बोलविलेल्या अधिवेशनावर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा मंत्र्यांनी घेतलेल्या शपथविधीवर आक्षेप नोंदविला. हंगामी विधानसभा अध्यक्ष बदलून त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती केली त्यावर आक्षेप घेतला होता.

यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे अधिवेशन नियमाला धरुन होत नाही. जे अधिवेशन 27 नोव्हेंबरला झाले होते त्याच्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे अधिवेशनाचा शुभारंभ वंदे मातरमने, त्यानंतर राज्यपालांनी केलेल्या अस्थायी स्वरुपाच्या नेमणुकीची घोषणा, भारतीय संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ आणि राष्ट्रगीत होते. याचा अर्थ त्यादिवशी ते अधिवेशन संस्थगित झाले. आपण राष्ट्रगीत तेव्हाच घेतो जेव्हा अधिवेशन संस्थगित करतो. राष्ट्रगीत झाल्यावर ते अधिवेशन संपते. तर पुन्हा अधिवेशन सुरु करण्यासाठी राज्यपालांचे समन्स काढावे लागते. तुम्ही 7 दिवस अधिवेशन स्थगित करु शकता, पण त्यासाठी तशी घोषणा करावी लागते. आपण घोषणाच केली नाही. आपण या ठिकाणी अधिवेशन संपवले.

- Advertisement -

म्हणून हे अधिवेशन नियमबाह्य आहे. जर सत्ताधार्‍यांकडे बहुमत आहे, असे त्यांना वाटते तर मग नव्याने समन्स काढायला अडचण काय होती. आम्हाला रात्री 1 वाजता का कळवले. आमचे सदस्य पोहचू नये म्हणून? विश्वासमताच्यावेळी आमचे सदस्य हजर राहू नये म्हणून? जे सदस्य लांबून येणार होते त्यांनी कसे यायचे?, असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले.

संविधानाने कशी शपथ घ्यावी याचा लेखी नमुना दिला आहे. राज्यपालांनी लेखी स्वरुपात दिलेल्या नमुन्यातीलच शपथ घ्यावी लागते. तरच ती शपथ ग्राह्य मानली जाते. आपल्याच देशात नाही, तर जगातही असेच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी चुकीची शपथ घेतल्यानंतर त्यांना दुसर्‍या दिवशी पुन्हा शपथ घ्यावी लागली होती. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ संविधानाप्रमाणे नाही. म्हणून अशाप्रकारचा मंत्र्यांचा परिचय करुन देणे संविधानाला मान्य नाही, असे स्पष्ट करतानाच फडणवीस म्हणाले की, पुन्हा हंगामी अध्यक्ष का नेमण्यात आले. त्यात बदल करण्याची गरज काय होती. या ठिकाणी सर्व गोष्टींची पायमल्ली होत आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात अध्यक्षाची निवड झाल्याशिवाय विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आलेला नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -