घरमहाराष्ट्रनिसर्गाची जपणूक करूनच विकास

निसर्गाची जपणूक करूनच विकास

Subscribe

विकासकामासाठी तांत्रिक सल्ला देणारी संस्था स्थापन करावी, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनानिमित्त वेबिनार

विकासकामे करताना ती निसर्गाची जपणूक करून कशी केली जावीत हे सांगणारी आणि यासाठीचा तांत्रिक, शास्त्रीय सल्ला देणारी आणि जिचा सल्ला बंधनकारक असला पाहिजे अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन व्हावी म्हणून महाराष्ट्राने देशात सर्वात आधी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केले.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने शनिवारी एका वेबिनारचे आयोजन केले. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य असल्याचे स्पष्ट केले. जंगलाचा र्‍हास करून विकासकामांचे प्रस्ताव जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असे नाही, असा खुलासाही त्यांनी केला. रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. माझ्या मते संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी. आपण ती जपली पाहिजे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास करत चाललो आहोत. मानव वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचे पाहिले आहे का, त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून, पाडून तिथे राहण्यास सुरुवात केली असे ऐकले आहे का, नाही. पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसते. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तौत्के चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदलास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. जैवविविधतेत नष्ट होणार्‍या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर
आरेचे जंगल आपण वाचवले. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपले. जगात अशाप्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी जैवविविधता मंडळाने तयार केलेल्या माहितीपटाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या ऑनलाईन वेबिनारमध्ये जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव हिम्मतराव पाटील,वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रवीण श्रीवास्तव यांच्यासह राज्यभरातील वनाधिकारी सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -