रेल्वेच्या मेगा ब्लॉकमध्येही 20 हजार पर्यटकांची राणी बागेला भेट, प्रशासनाला 9 लाखांचे उत्पन्न

मुंबई : आठवड्याच्या अखेरीस मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. अशा स्थितीतही 20 हजारांहून अधिक पर्यटकांनी भायखळा येथील राणीच्या बागेत भेट देऊन प्राणी बघण्याचा व जंगल सफरीचा मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे राणी बाग प्रशासनालाही त्याद्वारे नऊ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. मुंबईत 24 तास म्हणजे दिवसा व रात्रपाळीतही कामकाज चालू असते. लोकलसेवा ही या शहराची जीवनरेखा आहे. मात्र सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानच्या ब्रिटिश कालीन कर्नाक पुलाच्या तोडकामासाठी मध्य रेल्वेची वाहतूक तब्बल 27 तास थांबणार असल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने अगोदरच केली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फक्त भायखळा रेल्वे स्थानकापर्यँत तर हार्बरची वाहतूक फक्त वडाळापर्यंत सुरू होती. अशा परिस्थितीतही मुंबई व मुंबईबाहेरील 20 हजार 376 हौशी पर्यटकांनी भायखळा येथील राणीच्या बागेला भेट दिली. यासंदर्भातील माहिती राणी बागेचे (वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय) संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

मुंबईत गेल्या काही कालावधीत गोखले पूल व हिमालय या पुलांच्या दुर्घटनांमुळे व त्यात झालेल्या जीवित हानीमुळे दादर टिळक पूल, कर्नाक पूल, घाटकोपर, हेंकॉक पूल आदी विविध धोकादायक पुलांचा विषय ऐरणीवर आला. तेव्हापासून मुंबईतील पूलदुरुस्तीच्या कामाला गती मिळाली आहे. मुंबई महापालिका व रेल्वे प्रशासन यांनी समन्वयाने कर्नाक पुलाच्या दुरुस्ती व तोडकामाचे काम हाती घेतले. त्यासाठी शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून रविवारी रात्री 2 वाजेपर्यंत 27 तासांचा ब्लॉक जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर पडताना विशेषतः सीएसएमटी, मस्जिद बंदर दिशेने प्रवास करणे म्हणजे डोक्याला ताण देण्यासारखे होते.

सुदैवाने मध्य रेल्वेची वाहतूक भायखळा रेल्वे स्थानकापर्यत चालू होती. त्यामुळे त्याही परिस्थितीत मुंबईकर व काही बाहेरील पर्यटक असे एकूण 20 हजार पर्यटक हे खास करून बच्चे कंपनीच्या आग्रहावरून व पूर्वनियोजित कार्यक्रमावरून घराबाहेर पडले आणि त्यांनी भायखळा येथील राणी बाग गाठली. राणी बागेत सहपरिवार, मित्र- मैत्रिणींसह व बच्चे कंपनी यांच्यासह जाऊन वाघ, साप, पक्षी, पेंग्विन यांना बघण्याचा मनमुराद आनंद लुटला. मात्र घरी जाताना भायखळा रेल्वे स्थानकात गर्दीला तोंड देत या पर्यटकांनी संध्याकाळी आपले घर गाठले. सुदैवाने, दुपारी 3.30 वाजल्यापासूनच लोकल सेवा सुरू झाली व मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

राणीच्या बागेत रविवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत जवळजवळ 19 हजार 781 पर्यटकांनी ऑफलाइन तर 595 पर्यटकांनी ऑनलाइन तिकीट काढून राणी बागेत फिरण्याचा आनंद लुटला. त्यामुळे राणी बाग प्रशासनाला 8 लाख 97 हजार 870 रुपये इतके उत्पन्न मिळाले.