घरमहाराष्ट्र'कोल्हापूर आणि सांगलीतील वीजदेयक भरण्यास मुदतवाढ'

‘कोल्हापूर आणि सांगलीतील वीजदेयक भरण्यास मुदतवाढ’

Subscribe

कोल्हापूर ९९ तर सांगली शहराचा ९८ टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. पुरामुळे अनेकांना वीजबिल भरता न आल्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले होते. या महापूर कोल्हापूर आणि सांगलीतील घरे उद्धवस्त झाले होते. अनेक पूरग्रस्त नागरिक सात दिवस वीज, पाणी, खायला पूरेस अन्न नव्हते, अशी अवस्थेत राहत होती. जरी पूर ओसरला असाला तरी अनेक प्रश्न पूरग्रस्त नागरिकांसमोर आहेत. या नागरिकांनी मदत करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. या महापुरामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणने युद्धपातळीवर पूर्ववत केल्याने पूरग्रस्त भागात जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत झाली आहे. कोल्हापूर शहरातील ९९ टक्के तर सांगली शहरातील ९८ टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून, ग्रामीण भागातीलही ९० टक्के वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. तसेच पुरामुळे अनेकांना वीजबिल भरता न आल्याने पूरग्रस्त भागातील लघुदाब ग्राहकांना देयक भरण्यास १ महिना तर उच्चदाब ग्राहकांना १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिली.

४२ उपकेंद्र पुरामुळे बंद पडली

गेली दोन दिवस महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार आणि संचालक दिनेशचंद्र साबू कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. प्राथमिक अंदाजानुसार महावितरणचे कोल्हापूर जिल्ह्यात ४९ कोटी तर सांगलीत ४७ कोटी असे ११६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सहा हजारांवर स्थानिक लोकांना त्याचा फटका बसला. ४२ उपकेंद्र पुरामुळे बंद पडली होती. कोल्हापुरातील नागाळा पार्क, दुधाळी तर सांगलीतील कोल्हापूररोड आणि शेरीनाला उपकेंद्राला तसेच दोन्ही शहरातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटून महावितरणने केलेल्या कामांचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ त्यांनी जाणून घेतला. दोन्ही ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसोबत समुह भोजन घेत संवाद साधत असेच काम कायम करत राहण्याचे आवाहनही केले.

- Advertisement -

आपत्कालिन परिस्थितीसाठी सज्ज असले पाहिजे

पुढे बोलताना संजीव कुमार म्हणाले, अशी नैसर्गिक आपत्ती दुर्दैवाने कधी ओढावू नये. तरीही आपण आपत्कालिन परिस्थितीसाठी सज्ज असले पाहिजे. ज्या वाहिन्यांना पुराचा फटका बसला, त्या वाहिन्यांची उंची वाढवण्यासाठी ‘मोनो टॉवर’ उभारण्याचे आणि उपकेंद्रांना उंच भागात नव्याने जागा शोधून तसा नियोजन आराखडा बनविण्याचे आदेशही त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. तसेच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि मनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनीही संजीव कुमार यांची भेट घेतली. महावितरणने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा तातडीने सुरू केला. त्याबद्दल सर्वांनी संजीव कुमार यांचे आभार मानले.

दोन्ही जिल्ह्यातील वीज यंत्रणा गतिमान झाली

पुरामुळे नादुरुस्त झालेले मीटर, रोहित्र, खांब बदलण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि मनुष्यबळ ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे आणि संजीव कुमार यांनी तातडीने कोल्हापूरला रवाना केले. ज्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील वीज यंत्रणा गतिमान झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील २६ उपकेंद्र बाधित झाले होते. शुक्रवारी सर्व उपकेंद्र सुरू असून सांगलीतील १६ पैकी बालाजी मंदीर, शेरीनाला आणि पणुंद्रे ही उपकेंद्रे वीज वाहिन्या पुरामुळे बाधित झाल्याने बंद आहेत. उद्या उशिरापर्यंत ही उपकेंद्रेही सुरु होतील. सबंध दौऱ्यात प्रादेशिक संचालक सुनील पावडे आणि मुख्य अभियंता अनिल भोसले, माध्यम सल्लागार पी.एस.पाटील तसेच अभियंत्यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

उपकेंद्राची वीज हानी कमी करा 

कोल्हापूर शहरातील नागाळा पार्क आणि दुधाळी या वीज उपकेंद्रांना दिलेल्या भेटी दरम्यान उपकेंद्रांची वीज हानी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अभियंत्यांना दिल्या. याशिवाय उपकेंद्रातील स्वच्छता आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेली सुरक्षा साधने तपासून ती कटाक्षाने वापरण्याच्या सूचनाही जनमित्रांना केल्या.

शिरटी आणि नृसिंहवाडीला अध्यक्षांची भेट

नृसिंहवाडी येथे कालपर्यंत पाणी होते. पाणी ओसरताच येथे इतर भागातील अतिरिक्त मनुष्यबळ पाठवून बुडालेले सर्व वीजमीटर बदलून वीजपुरवठा सुरु करण्याचे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले. तर शिरटी (ता. शिरोळ) येथील उपकेंद्राला व तेथील काही ठिकाणांना भेटीही त्यांनी दिल्या. येथे महावितरणचे अनेक रोहित्र भुईसपाट झाली आहेत. अद्याप ३ रोहित्रांवरील ३३७ ग्राहक बंद आहेत. त्यांचा वीजपुरवठाही सुरळीत करण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरु होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -