घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराज्यात डोळ्यांची साथ, गॉगल विक्रीत लाट; 'हे' आहेत गॉगल वापरण्याचे फायदे

राज्यात डोळ्यांची साथ, गॉगल विक्रीत लाट; ‘हे’ आहेत गॉगल वापरण्याचे फायदे

Subscribe

नाशिक : वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजार पसरू लागले असून सध्या नाशिकसह संपुर्ण राज्यात डोळ्याची साथ आली आहे. डोळ्यांच्या आजाराने लहान-मोठे,स्त्री-पुरुष सर्वच त्रस्त असले तरी या आजाराने गॉगल विक्रेत्यांना लॉटरी लागली आहे. सद्यस्थितीत सर्वच गॉगल विक्रेत्यांकडे गॉगल खरेदीदारांची संख्या दुपटी-तिपटीने वाढली असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय नेत्र रोग तज्ञांकडेही रुग्णांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.

डोळे आले की लोक सगळ्यात आधी काय करत असतील तर ते काळा चष्मा लावतात. काळा चष्मा लावल्याने बाहेरच्या प्रकाशाचा डोळ्यांवर पडणारा ताण कमी होतो,शिवाय नेत्र रुग्णाचा त्रासही काहीसा कमी होतो. त्यामुळे डोळे आलेल्या व्यक्तींकडून काळा चष्मा वापरण्याला प्राधान्य दिले जाते. शिवाय आपल्याकडे डोळे आलेल्या रुग्णाच्या नुसत्या डोळ्यांकडे पाहिलं तरी हा संसर्ग होतो असा गैरसमज आहे. त्यामुळे आपल्याकडून इतरांना त्रास होऊ नये या भावनेनेही काळा चष्मा वापरण्याला प्राधान्य दिले जाते.

- Advertisement -

यासंदर्भात नेत्रतज्ज्ञांची मते जाणून घेतली असता, काळा चष्मा घातल्याने आय फ्लूपासून बचाव होऊ शकत नाही. मात्र संक्रमित व्यक्तीच्या डोळ्याकडे पाहून आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थ वाटू नये यासाठी काळा चष्मा लावला जातो. बाकी अशावेळी जर कोणी काळा चष्मा लावला असेल पण ती व्यक्ती संक्रमिताच्या संपर्कात आली किंवा त्याच्या वस्तू वापरत असेल तर संसर्ग झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तुम्ही काळा चष्मा घालू शकता पण यामुळे रोगाचा धोका टाळता येऊ शकतो यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. कारण स्पर्श केल्याने हा आजार पसरत असतो.त्यामुळे संरक्षणासाठी वेळोवेळी हात स्वच्छ धुण्याची तसेच स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे नेत्र तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डोळे आल्यावर चष्मा घालण्याचे फायदे

  • फक्त काळा चष्मा घालण्याचा फायदा म्हणजे यामुळे डोळ्यांचे उन्हापासून संरक्षण होते.
  • जर बाधित व्यक्तीने चष्मा घातला असेल तर तो वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळू शकतो.
  • जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा खाज येते किंवा जळजळ होते आणि आपल्याला वारंवार स्पर्श करावासा वाटतो, तर चष्मा आपल्याला या सवयीपासून दूर ठेवू शकतो.
  • डोळ्यात धूळ-माती गेल्यास जळजळ किंवा खाज सुटते आणि डोळ्यात आय फ्लूची समस्या असेल तर ती आणखी वाढते.
  • चष्मा लावल्याने डोळ्यात माती किंवा धूळ येत नाही.

डोळ्यांचा फ्लू टाळण्यासाठी

  • डोळ्यांचा हा संसर्ग टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वच्छता. याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वारंवार हात धुण्याची सवय लावा.
  • एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास आपले हात आणि वस्तू सॅनिटाईज करावे.
  • दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवून त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.
  • डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडणे टाळायला हवे.
  • डोळ्यांना वारंवार हात लावू नये आणि आपल्या वापराच्या वस्तू किंवा कपडे, रुमाल आदी वेगळ्या ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.

डोळे येण्याची समस्या ही संसर्गजन्य प्रकारात मोडत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. डोळे आलेल्या व्यक्तीने स्वतःच काळजी घेऊन जनसंपर्क टाळायला हवा. लहान मुलांमध्ये त्रास जाणवत असेल तर त्यांना शाळेत पाठवू नये. स्वच्छतेची काळजी घेणे हाच योग्य उपाय आहे. : डॉ.सुनिल चौधरी, नेत्र विकार तज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिक

सध्या डोळ्यांची साथ असल्याने काळ्या गॉगलची मागणी वाढली आहे. गॉगल खरेदीमध्ये लहान मुलांच्या तसेच महिलांच्या गॉगललाही मोठी मागणी वाढल्याने डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण लहान मुले व महिलांमध्येही अधिक असल्याचे दिसून येत आहे. : शुभम कोठावदे, विक्रेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -