घर महाराष्ट्र Balu Dhanorkar News : ओबीसी समाजात असा नेता होणार नाही; जावयाच्या निधनाने...

Balu Dhanorkar News : ओबीसी समाजात असा नेता होणार नाही; जावयाच्या निधनाने सासऱ्यांचा हुंदका दाटला

Subscribe

बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांचे सासरे सुरेश काकडे यांना देखील अश्रु अनावर झालेले पाहायला मिळाले. काकडे यांनी धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ओबीसी समाजात असा नेता किंवा खासदार पुन्हा होणार नाही.

काँग्रेसचे खासदार (Congress Chandrapur MP) सुरेश तथा बाळू धानोरकर यांचे नवी दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात निधन झाले. बाळू धानोरकर यांची प्रकृती 28 मे रोजी अचानक बिघडल्याने त्यांना एयर एम्बुलन्सद्वारे नागपूर येथून नवी दिल्लीत उपचारासाठी रवाना करण्यात आले होते. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात (Medanta Hospita) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 48 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, दोन मुले, आई, भाऊ भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे. (Balu Dhanorkar passes away)

हेही वाचा – ‘मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहाणार नाही’, काँग्रेसच्या ‘या’ एकमेव खासदारात होती पंतप्रधानांना भिडण्याची धमक

- Advertisement -

धानोरकर कुटुंबियांवर गेल्या तीन दिवसांत दोन मोठे आघात झाले आहेत. 27 मेला बाळू धानोरकर यांचे वडिल नारायण धानोरकर यांचे निधन झाले. त्यानंतर आज खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने धानोरकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाळू धानोरकर यांचे सासरे सुरेश काकडे यांना देखील अश्रु अनावर झालेले पाहायला मिळाले. काकडे यांनी धानोरकर यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ओबीसी समाजात असा नेता किंवा खासदार पुन्हा होणार नाही.

यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना बाळू धानोरकर यांचे सासरे सुरेश काकडे म्हणाले की, “खासदार बाळू धानोरकर राज्यातले काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्याचा मला अभिमान होता. लोक मला विचारायचे, तुमचा जावई खासदार आहे. मी अभिमानाने सांगत होतो, कुठल्याही कार्यक्रमात ते जेव्हा स्टेजवर असायचे, तेव्हा मला ते आवाज द्यायचे, विचारपूस करायचे. असा त्यांच्या स्वभाव होता. जावई खासदार आणि मुलगी आमदार ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

- Advertisement -

“जावईबापूंची प्रकृती चिंताजनक होती. हे मला नंतर कळलं. मी जेव्हा त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारसाठी गेलो, तेव्हा प्रतिभा माझ्याजवळ आली अन् तिने सांगितलं की त्यांची प्रकृती बरोबर नाही. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. त्यांच्यानंतर आता ओबीसी समाजात किंवा कुणबी समाजात असा खासदार पुन्हा होणार नाही,” असे सांगत असताना सुरेश काकडे यांना हुंदका अनावर झाला.

बाळू धानोरकर यांचे पार्थिव आज (ता. 30 मे) सकाळी नागपूर आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर अवस्था बिकट झाली होती. अशा वेळेस काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी हिने त्यांना आधार दिलेला पाहायला मिळाला. दुपारी दीड वाजता धानोरकर यांचे पार्थिव वरोराकडे रवाना झाले आहे. दुपारी चार वाजेपासून धानोरकर यांचे पार्थिव निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आले असून उद्या सकाळी 11 वाजता धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

- Advertisment -