सहप्रवाशी हेल्मेटसक्तीप्रकरणी दुसर्‍या दिवशीही धडाका सुरुच

सहप्रवाशी हेल्मेट सक्तीप्रकरणी दुसर्‍या दिवशीही वाहतूक पोलिसांची कारवाई सुरु होती. शुक्रवारी दिवसभरात वाहतूक पोलिसांनी 6 हजार 635 बाईकस्वाराविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती. गुरुवार 9 जूनपासून बाईकस्वारासोबत प्रवास करणार्‍या सहप्रवाशांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती.

या कारवाईची अंमलबजावणी गुरुवारी सुरु झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी 6 हजार 271 बाईकस्वारासह सहप्रवाशांवर कारवाई केली होती. त्यात बाईकवरुन प्रवास करणार्‍या 2 हजार 334 चालक, 3 हजार 421 सहप्रवाशी आणि दोघांनी हेल्मेट घातले नाही अशा 516 जणांवर कारवाई केली होती. ही कारवाई दुसर्‍या दिवशीही सुरुच होती. शुक्रवारी दिवसभरात पोलिसांनी 6 हजार 635 जणांवर कारवाई केली. त्यात 2 हजार 572 बाईकस्वार, 3 हजार 631 सहप्रवाशी आणि दोघांनीही हेल्मेट घातले नाही अशा 432 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई आगामी दिवसांत अशाच प्रकारे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बाईक चालविताना बाईकस्वारासह सहप्रवाशांनी हेल्मेट घालावे, शक्यतो पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नये. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


हेही वाचा : मी काहीही चुकीचं केलं नाही, जितेंद्र आव्हाडांचं आक्षेपावर स्पष्टीकरण