घरमहाराष्ट्रभर समुद्रात दे दणादण!

भर समुद्रात दे दणादण!

Subscribe

एलईडी मासेमारीचा वाद, ८ जखमी

एलईडीद्वारे मासेमारी करणारे आणि बुल नेट मासेमारी करणार्‍या आक्षी आणि बोडणीमधील मच्छीमारांमध्ये भर समुद्रात तुफान हाणामारी झाली. गुरुवारी रात्री मुरुड तालुक्यातील कोर्लई समुद्रात उशिरा घडलेल्या या हाणामारीच्या घटनेत दोन्ही गटातील 8 जण जखमी झाले. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्रीच्या वेळी एका बांबूला किंवा काठीला एलईडी बल्ब लावून बोटीवरील जनरेटरच्या सहाय्याने तो प्रज्वलित करून समुद्राच्या पाण्यात सोडला जातो. परिणामी बल्बच्या प्रकाशाकडे मासे आकर्षिले जातात. प्रत्यक्षात अशा मासेमारीला कायद्याने बंदी आहे. मात्र तरीही अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील 4 मासेमारी बोटी एलईडीच्या माध्यमातून मासेमारी करीत होत्या. तर बोडणी येथील मच्छीमार दोन बोटींच्या सहाय्याने बुल नेट (पारंपरिक पद्धतीने) मासेमारी करीत होते. त्यावेळी समोरून येणार्‍या आक्षीच्या मच्छीमार बोटींना बाजूला जाण्याचा इशारा केला. परंतु बोटींना असलेल्या वेगामुळे न थांबता बुल नेट मासेमारी करणार्‍या मच्छीमारांची जाळी तोडत त्या पुढे गेल्या.

- Advertisement -

यामुळे जाळे तुटून लाखोंचे नुकसान झाले. त्याचा राग आल्याने एका गटाने दुसर्‍या गटावर दगडफेक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे बोडणीमधील गटाने त्याच परिसरात मासेमारी करणार्‍या अन्य सहकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर काही कालावधीत अन्य बोटी तेथे आल्यानंतर दोन्ही गटामध्ये भर समुद्रात धुमश्चक्री उडाली आणि रेवसमधील मासेमारी करणार्‍यांनी आक्षीच्या बोटींवर ताबा मिळवत त्यांना पकडून मांडवा सागरी पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासाठी निघाले. यावरून दोन गटात हाणामारी झाली.

पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले. मात्र पुन्हा शुक्रवारी प्रकरण चिघळले. त्यानंतर स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी दोन्ही गटाच्या सदस्यांना एकत्रित बसवून समझोत्याने तोडगा काढून प्रकरण मिटविले आहे. दरम्यान, हा प्रकार 12 नॉटिकल माईल्सच्या बाहेर झाला असल्याने हे प्रकरण मुंबई यलोगेट पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक धर्मराज सोनके यांनी दिली.

- Advertisement -

सदरची घटना ही भर समुद्रात पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर घडलेली आहे. याबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत अलिबागच्या पोलीस उप अधीक्षकांबरोबर चर्चा झाली आहे. एलईडी मासेमारी करीत असलेल्या बोटींवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, त्याचबरोबर अन्य कारवाई करण्यासंदर्भातील प्रकिया सुरू आहे.
-अभयसिंग शिंदे-इनामदार, आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -