खासगी हॉस्पिटल बिलात फसवणूक झालेय ? काउंटरवरुन ‘इथे’ करा फक्त एक फोन

खासगी रुग्णालयातून एक फोन कॉल करताच रुग्णाचे बिल जास्त आहे की नाही याचा छडा लावण्याची चांगलीच शक्कल औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लढवली आहे.

Fraud in private hospital bill? Just make call from the counter private Hospital
खासगी हॉस्पिटल बिलात फसवणूक झालेय ? काउंटरवरुन 'इथे' करा फक्त एक फोन

राज्यात कोरोनाचा कहर वाढतोय तसा आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. रुग्णालयात बेडचा तुटवडा भासत आहे. सरकारी तसेच खासगी रुग्णालयेही रुग्णांनी भरली आहे. अशापरिस्थितीत मात्र खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या बिलात अनेक घोळ केल्याचे समोर आले आहे. खासगी रुग्णालय रुग्णांना अनेक वेळा वाढीव बिल देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरुन अनेक आरोप प्रत्यारोपही करण्यात आलेत. मात्र आता खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या बिलात काही अफरातफर केल्याचे तुमच्या लक्षात आले तर त्याचा निकाल तिथल्या तिथे लावता येणार आहे. खासगी रुग्णालयातून एक फोन कॉल करताच रुग्णाचे बिल जास्त आहे की नाही याचा छडा लावण्याची चांगलीच शक्कल औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लढवली आहे.

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारानंतर रुग्णालय अवाजवी बिल आकारत असल्याचे जर रुग्णांच्या नातेवाईकांना वाटले तर रुग्णालयाच्या बिल काऊंटरवरुनच एक फोन करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या काऊंटरवर संपर्क क्रमांकाची एक यादी लावण्यात येईल,रुग्णांच्या नातेवाईकांना बिलात काही फेरफार झाल्याचे वाटत असल्यास त्वरित दिलेल्या क्रमांकावर फोन कॉल करुन प्रशासनाला कळवायचे आहे.

त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयातून रोज किती रुग्णांना डिस्चार्ज मिळतो त्यांच्या बिलांचा रोजचा अहवाल रोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रशासनाला द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी समितीने दिल्या आहेत. बिलामध्ये जास्त रक्कम वाटल्यास त्या बिलाची शाहनिशा करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या नव्या कल्पनेमुळे सर्वसामन्यांना वाढीव बिल देऊन लुटणाऱ्या खासगी रुग्णालयांचा पर्दाफाश करता येईल.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: कोल्हापूरात लॉकडाऊनला हरताळ, पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिका