घरमहाराष्ट्रभाजप आमदार बोले अन् पालिका आयुक्त डोले, महापालिकेचे वरातीमागून घोडे

भाजप आमदार बोले अन् पालिका आयुक्त डोले, महापालिकेचे वरातीमागून घोडे

Subscribe

आता हाच पूल पादचारी तसेच दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का? याची चाचपणीही महापालिकेकडून केली जात आहे. त्यामुळेच भाजप आमदार बोले आणि महापालिका आयुक्त डोले, अशी स्थिती निर्माण झाली आहे

मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोपाळकृष्ण गोखले रेल्वे पूल धोकादायक स्थितीत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेने ७ नोव्हेंबरला वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे पश्चिम उपनगरातील बोरिवलीपासून वांद्र्यापर्यंत वाहन चालकांना प्रचंड वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वरवर पाहणी करत कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानं वाहन चालकांसह स्थानिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

परंतु आता हाच पूल पादचारी तसेच दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का? याची चाचपणीही महापालिकेकडून केली जात आहे. त्यामुळेच भाजप आमदार बोले आणि महापालिका आयुक्त डोले, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिकेचे अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांसह गोखले पुलाला भेट दिली होती. त्यावेळी स्थानिक आमदार अमित साटम, विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी हेसुद्धा उपस्थित होते.

- Advertisement -

मोरबी पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवरही लोढा, साटम यांनी अधिकारी आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सांगून तात्काळ गोखले पूल बंद केला, परंतु त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचं निदर्शनास आलं. विशेष म्हणजे कोणतीही निविदा न काढता, वाहतुकीसाठी धोकादायक आहे की नाही याची चाचपणी न करता थेट पूल बंद केल्यानं स्थानिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे. खरं तर पूल बंद असल्यानं कार्यालयं सुटण्याच्या वेळेत पश्चिम उपनगरांत वाहनचालकांसह नागरिकांना प्रचंड वाहतुकीच्या कोंडीचा सामनाही करावा लागतोय. त्यामुळेच आता तो पुन्हा वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या घाट घातला जातोय.

या पुलाचे बांधकाम करण्याचे काम महापालिकेने मान्य केलेय. या पुलाच्या दुरुस्तीचे काम आणि त्यावरील संपूर्ण खर्च मुंबई महापालिका करणार आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासन निविदा प्रक्रिया राबविणार असून, त्यानंतर आयआयटीने दिलेल्या डिझाईननुसार पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. त्याकरिता पूल बंद केल्यानंतर आता निविदाही मागवण्यात आल्यात. तर रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा धोकादायक भाग रेल्वे प्रशासनही पाडणार आहे. दुसरीकडे तो पूल थेट बंद न करता वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवावा, अशी स्थानिकांनी मागणीही केलीय.

- Advertisement -
reconstruction the gokhale bridge in andheri
अखेर अंधेरीतील गोखले पुलाची पुनर्बांधणी

गोखले पुलाचा भाग पडून दुर्घटना घडल्यापासून गोखले पूल चर्चेत आला. पालिकेने त्या घटनेनंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम घाईघाईने केले होते. मात्र सदर काम नीटपणे न झाल्याने या पुलाचा धोका अद्याप टळलेला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे आता या पुलाच्या दुरुस्तीचे काम नव्याने हाती घेण्यात येत आहे. या कामासाठीच पालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी ७ नोव्हेंबरपासून या पुलावरील वाहतूक बंद केली. सदर पुलाचे तोडकाम कोणी करायचे यावरून पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात वाद होता. मात्र या पुलाच्या दुरुस्ती कामावरून मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मध्यस्थीने पश्चिम रेल्वेने पुलाच्या तोडकामाची जबाबदारी घेतलीय.

रेल्वे प्रशासन या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवित आहे. ८४ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. कंत्राटदाराची नेमणूक झाल्यावर सदर पुलाच्या दुरुस्ती काम युद्धपातळीवर हाती घेऊन ते लवकरात लवकर पार पाडण्याचा पालिकेचा प्रयत्न असणार आहे. परंतु कोणतीही पूर्वतयारी न करता थेट पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानं आणि तो सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.


हेही वाचाः विनयभंगप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -