घरमहाराष्ट्रसरकार मुंबईतील लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत

सरकार मुंबईतील लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत

Subscribe

करोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकार योग्य पावले उचलत आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी कमी करून करोनाचा संसर्ग टाळायला हवा. मुंबईतील गर्दी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे सरकार मुंबई लोकल बंद करण्याच्या मानसिकतेत आहे. तोच विचार पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनावश्यक प्रवास टाळावा, जर अत्यंत गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा नाईलाजास्तव सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल, असेही ते म्हणाले.

पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, करोना रोखण्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे. राज्यातला बाधितांचा आकडा 5१ वर गेला आहे. सरकारने जे निर्णय घेतले आहेत, ते निर्णय पुढचे आदेश निघेपर्यंत कायम राहतील. मुंबई, पुणे, पिंपरी आणि नागपुरातील अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व दुकाने, कार्यालये बंद राहतील. लग्नासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दी करू नये फक्त मोजकी लोकं जमावी. जर शक्य असेल तर लग्न पुढे ढकला. हे वेगळ्या प्रकारचे संकट आहे, गर्दी टाळायची आहे, त्याची सुरुवात स्वतः पासून करायची आहे, लग्न असो की कोणतंही कार्य, दहावं-तेरावं कार्य असलं तरी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा. लग्न, अंत्यविधी, दशक्रिया विधीतील गर्दी टाळा, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

होमगार्ड पुरवणार
पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी होमगार्ड लागणार आहेत ते देण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी उद्योजकांना आवाहन आहे की अधिकार्‍यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करावं. सर्वांनी शक्यतो घरामध्ये थांबून काम करावं. प्रवास टाळण्याचा प्रयत्न करा, घाबरून जाऊ नये, ही सामूहिक जबाबदारी आहे. पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत. मी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. कुठल्याही निधीची कमतरता भासू नये. काही निर्णय 31 मार्च 2020 पर्यंत झालेले होते. पुढचे आदेश निघेपर्यंत या सगळ्या निर्णयांची अंमलबजावणी चालू राहील. 10 आणि 12 वी परीक्षा सोडून सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचारी सतत काम करत आहेत. त्यांना ब्रेक मिळालाच नाही. त्यांना एखाद दिवस ब्रेक मिळावा यासाठी प्रयत्न करतोय. डॉक्टरांच्या जागी डॉक्टरच लागतील. मात्र, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही प्रकारचं संकट येतं त्यावेळी त्या संकटाचा मुकाबला सगळ्यांनी मिळून करायचा असतो. ही एक सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही या गोष्टी गांभीर्याने घ्यावे. पुढचे टप्पे फार महत्त्वाचे आहेत. काहीजण उपचारादरम्यान त्यातून बाहेर पडले आहेत. जनता कर्फ्यूला पाठिंबा द्यावा, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

रेशनवर तीन महिन्यांचे स्वस्त धान्य देतोय. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पूर्णतः निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंधरा दिवस महत्त्वाचे आहेत. ग्रामीण रुग्णालयात सगळ्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीला, नगरपरिषदेला निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिलेत. करोनाच्या संदर्भात ज्या गोष्टी लागतील त्या खरेदी करण्याची मुभा जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आली आहे, असं अजित पवार म्हणाले. अनेकजण हातावर शिक्के असूनही पळून जात आहेत. मात्र पळून जाऊ नका. आजार बरा होतो, डॉक्टरांचे ऐका. आरोग्य मंत्री चांगलं काम करत आहेत, जे चांगलं काम करतायेत त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

बंदचा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत
राज्य सरकारने खबरदारी म्हणून, जीवनावश्यक सेवा वगळून मुंबई महानगर प्रदेशसह नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदचा निर्णय ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -