घरमहाराष्ट्रहिंसा थांबवा; सरकार चर्चेस तयार - मुख्यमंत्री

हिंसा थांबवा; सरकार चर्चेस तयार – मुख्यमंत्री

Subscribe

दोन दिवसांच्या हिसंक आंदोलनानंतर सरकार आंदोलनकर्त्यां नेत्यांशी चर्चा करायला तयार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयाकडून काढण्यात आले आहे.

सकल मराठा समाजाच्यावतीने काल महाराष्ट्र बंद पुकारल्यानंतर आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि सातारा शहरात बंद पाळला गेला. दोन दिवसांत अनेक ठिकाणी हिसंक आंदोलने पाहायला मिळाली. तसेच दोन दिवसांत दोन मराठा कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयातून याबाबत एक निवदेन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यास राज्य सरकार तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवेदनात म्हटले आहे.

आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित

राज्य सरकारने मराठा समाजासाठी अनेक निर्णय घेतले. विशेषत: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार पूर्णत: कटिबद्ध आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यासंदर्भातील कायदा तयार केला. परंतु, उच्च न्यायालयाने त्या कायद्याला स्थगिती दिली. त्यानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, तेथे राज्य सरकारला उच्च न्यायालयाच्या आदेशावर स्थगिती मिळाली नाही. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तथापि, यासंदर्भात संवैधानिक कारवाई पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोग स्थापन केला आहे. त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत संवैधानिक प्रस्ताव तयार केला जात आहे. सध्या हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे राज्य सरकार आपल्या अखत्यारितील सर्व बाबी पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितले आहे.

- Advertisement -

मराठा समाजासाठी अनेक योजना

यासोबतच छत्रपती राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना आणि मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्याचा व्यापक कार्यक्रम घेतला असल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे. या योजना अमलात आणण्यात कोणत्याही त्रुटी आढळून येत असतील, तर त्या चर्चेच्या माध्यमातून दूर करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मेगाभरतीच्या संदर्भात जो संभ्रम सकल मराठा समाजाच्या मनात निर्माण झाला आहे, त्याही बाबतीत चर्चा करून सर्वमान्य असा उचित निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे हिंसा किंवा आंदोलनाचा अवलंब न करता शासनाशी चर्चा करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

काही राजकीय नेते परिस्थिती आणखी चिघळवून त्याचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ व्यापक भूमिका घेऊन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हातभार लावावा, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -