घरताज्या घडामोडीमुंबईला मुसळधार पावसाने झोडपले; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले; रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

Subscribe

मुसळधार पावसाने शुक्रवारी मुंबईला सकाळपासून सायंकाळपर्यन्त चांगलेच झोडपून काढले. सकाळी १० वाजताच्या सुमारास उपनगरात काळ्या ढगांनी अंधारमय परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या उरात चांगलीच धडकी भरली होती.

मुंबई : मुसळधार पावसाने शुक्रवारी मुंबईला सकाळपासून सायंकाळपर्यन्त चांगलेच झोडपून काढले. सकाळी १० वाजताच्या सुमारास उपनगरात काळ्या ढगांनी अंधारमय परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या उरात चांगलीच धडकी भरली होती. काही लोकांनी तर बॉसला पटवून दुपारीच घरी निघायची तयारी केली. तर काही पालकांनी पावसाचा जोर पाहता मुलांना शाळेत न पाठवता घरीच बसवले. मुंबईत मिलन सब वे वगळता हिंदमाता, किंग्जसर्कल, सायन, कुर्ला आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले होते. तर रेल्वे व रस्ते वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. (Heavy rainfall alert in mumbai road and railway transport affected)

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – २९.८८ मिमी, पूर्व उपनगरात – ४४.४९ मिमी, पश्चिम उपनगरात – ४५.११ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शहर भागापेक्षाही उपनगरात जास्त पाऊस पडला.

- Advertisement -

हवामान खात्याने मुंबईत जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता अगोदरच वर्तवली व यलो अलर्ट दिला होता. त्यातच समुद्रात दुपारी ३.१७ वाजता मोठी भरती होती. त्यावेळी समुद्रात ३.४६ मिटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत एकाच दिवसात ९४४ मिमी इतका पाऊस पडला होता व त्याचवेळी समुद्रात ४.५० मिटरपेक्षाही जास्त उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे फ्लड गेट बंद केल्याने व मिठी नदीसह इतर नद्यांनाही पूर आल्याने मुंबईची तुंबई होऊन मोठी जीवित आणि वित्तीय हानी झाली होती.

सुदैवाने शुक्रवारी तशी भयानक परिस्थिती ओढवली नाही. अन्यथा विपरीत परिणाम झाला असता. दरम्यान, आगामी २४ तासांत मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना शनिवारी अधिक काळजी घ्यावी लागणार असून पालिकेलाही अलर्ट राहावे लागणार आहे.

- Advertisement -

मुंबईत घरे, झाडे यांची पडझड

मुंबईत सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शहर भागात -२ ठिकाणी, पूर्व उपनगरात – १ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – ८ ठिकणी अशा एकूण ११ ठिकाणी झाडे/ फांद्या कोडळण्याची दुर्घटना घडल्या. सुदैवाने या घटनांत कोणी जखमी झाले नाही. तसेच, पूर्व उपनगरात आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी १ याप्रमाणे २ ठिकाणी घर, भिंती यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र या घटनांत कोणी जखमी झाले नाही. त्याचप्रमाणे, शहर भागात १ ठिकाणी, पूर्व उपनगरात -२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरात – १ ठिकाणी अशा ५ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. मात्र सदर घटनांत कोणीही जखमी झाले नाही.

रस्ते वाहतुकीवर परिणाम

मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. वाहनांची वाहतूक मंदगतीने सुरू होती. त्यामुळे वाहन चालकांना, प्रवाशांना पावसाचा व वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. तसेच, रेल्वे वाहतुकीवरही काहीसा परिणाम झाला. त्याचा रेल्वे प्रवाशांना त्याचा काही प्रमाणात फटका बसला.

सायंकाळनंतर पावसाची उसंत; दिलासा

मुंबई शहर व उपनगरात सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे घराबाहेर कामासाठी पडणाऱ्या मुंबईकरांच्या उरात चांगलीच धडकी भरली होती. कामावर असतानाही पावसाचा सकाळपासूनचा जोर पाहता मुंबईकरांचे सर्व लक्ष बाहेरील पावसावर लागले होते आणि घरी जाण्याची ओढ लागली होती. मुंबईकर घरी तर घरचे कामाला गेलेल्या आपल्या आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईक यांना फोनाफोनी करीत होते. सुदैवाने सायंकाळी ५ नंतर मुंबईत पावसाचा जोर ओसरला. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आणि मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.


हेही वाचा – कोरोनाचा अंत आला जवळ, सर्वांनी प्रयत्न केल्यास…; WHO च्या प्रमुखांचे मोठे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -