घरमहाराष्ट्रबुलढाणा, नंदूरबारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचाही बसणार फटका

बुलढाणा, नंदूरबारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात; ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीचाही बसणार फटका

Subscribe

बुलढाणा : हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली असून नंदूरबारमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात दमदार पाऊस कोसळणार असा इशारा हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही सकाळपासून ढगाळ हवामानामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आधीच दिलेल्या अंदाजानुसार काल, शनिवारी रात्री बुलढाण्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.

- Advertisement -

नंदूरबार जिल्ह्यातही पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. हलक्या स्वरुपाचा पाऊस पडल्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नसल्याची शक्यता आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना काही प्रमाणावर फटका बसू शकतो.

दरम्यान, नंदूरबारमधील तापमान गेल्या काही दिवसांपासून 40 अंशावर होते. मात्र गेल्या दोन दिवसापासून तापमानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे मका, पपई, केळी आणि हरभरा या पिकांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

गारपीठीसह पावसाची शक्यता
हवामानातील अचानक झालेल्या बदलामुळे राज्यातील काही भागात गारपीठीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी चक्रवाताच्या वाढलेल्या प्रभावामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे वारे वाहत आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, ठाणे, रायगड, पालघर आणि विदर्भात 8 मार्चपर्यंत विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता आहे, तर काही भागात 7 मार्चच्या आसपास गारपीट होण्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवला आहे.

पिकांचे नुकसान होण्याची शक्यता
महाराष्ट्रातील काही राज्यात पाऊस पडल्यानंतर इतर राज्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज आणि उद्या मराठवाड्यासह औरंगाबाद आणि जालना येथेही हलक्या सरींची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात उद्यापर्यंत अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसू शकतो. द्राक्ष काढणीला आल्याने पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -