घरमहाराष्ट्रचॉकलेटच्या पॅकेटमधून गांज्याची तस्करी

चॉकलेटच्या पॅकेटमधून गांज्याची तस्करी

Subscribe

चॉकलेटच्या पॅकेटमधून तब्बल १९ किलो गांजाची तस्करी केल्याची घटना उघडकीस आहे. काकीनाडा एक्सप्रेसमध्ये ही घटना उघडकीस आली असून पोलीस गांजाची तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

सुप्रसिद्ध असलेल्या किटकॅट चॉकलेटच्या पॅकेटचा वापर गांजाची तस्करी करण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काचीगुडा येथून शिर्डीकडे जाणाऱ्या काकीनाडा एक्सप्रेसमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मनमाड आरपीएफने काकीनाडा एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून सुमारे १९ किलो गांजा भरलेले किटकॅटचे १२ पॅकेट जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी मनमाड रेल्वे पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस गांजा तस्करी करणाऱ्यांचा शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

काचीगुडा येथून शिर्डीकडे जाणारी काकीनाडा एक्सप्रेस मनमाडपासून जवळ असलेल्या अंकाई रेल्वे स्थानकावर थांबलेली होती. एस. एस घटोले आणि भय्या शेख गाडीची तपासणी करत असताना एका जनरल डब्यात शौचालयजवळ त्यांना पाच बॅगा बेवारसपणे आढळून आल्या. सदर बॅगांविषयी त्यांनी प्रवाशांकडे विचारपूस केली असता आमच्या बॅगा नाही असे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे या बॅगामध्ये संशयास्पद वस्तू तर नाही ना अशी शंका या दोन्ही आरपीएफ जवानांना आल्यानंतर त्यांनी आरपीएफ निरीक्षक के डी मोरे यांना याची माहिती दिली. गाडी मनमाड रेल्वे स्थानकावर आल्यानंतर बॅग ताब्यात घेण्यात आल्या. त्या उघडून पाहिल्या असता या बॅगामध्ये कीटकॅट चॉकलेटचे बारा मोठे पॅकेट आढळून आले. त्यात चॉकलेट असावे असा समज आरपीएफचा होता. मात्र पॅकेट उघडून पाहिल्यावर त्यात चक्क गांजा निघाला. त्या पॅकेटमध्ये सुमारे १९ किलो गांजा भरला असून त्याची बाजारात किंमत दीड लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या गांजाची तस्करी आंध्र प्रदेशातून केली जात असावी असा संशय पोलीस आणि आरपीएफ यांनी व्यक्त केला असून पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

- Advertisement -

वाचा – गांजा तस्करी करणारा बुवा गजाआड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -