घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगृहिणींनो आपले डबे, बटवे तपासून घ्या; 2 हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी

गृहिणींनो आपले डबे, बटवे तपासून घ्या; 2 हजारांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी

Subscribe

दिलीप कोठावदे । नाशिक

मे महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या नोटा बंद (Demonetisation) करण्याची घोषणा केली. त्यावेळी ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी आपल्याकडील दोन हजारांच्या नोटा आपल्या जवळच्या बँकेत जमा करणे अथवा बदलून घेण्याचे आवाहन केले होते. सद्यस्थितीत बँकांमध्ये दोन हजारांच्या नोटा जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, ३० सप्टेंबर ची मुदत संपायला आता अवघे १५ दिवस राहिले आहेत. सर्वसामान्य भारतीय कुटूंबातील प्रत्येक गृहिणीचा घरात एक छुपा बटवा अथवा डबा असतोच त्यात चुकून एखादी नोट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक गृहिणीने आपला डबा ,बटवा एकदा काळजीपूर्वक तपासून घेण्याची हीच ती वेळ आहे. कारण ३० सप्टेंबरपर्यंतच दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेकडे जमा करता येणार आहेत. त्यानंतर कपाळावर हात मारून घेण्याशिवाय दूसरा पर्याय उरणार नाही. (only 15 days remain for exchange 2 thousand rupees notes)

- Advertisement -

पहिल्या नोटबंदी काळात महिलांच्या घरात अडचणीत कामी येतील या भावनेतून जमा केलेल्या पाचशे, हजारांच्या नोटा अचानक समोर आल्या होत्या. मात्र, पंतप्रधान मोदींनी अचानक नोटबंदी जाहीर केल्याने महिलांना त्या नोटा नाईलाजास्तव बँकेत जमा कराव्या लागल्या होत्या. आता नोटा जमा करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरलेले असल्याने गृहिणींनी आपले डबे, बटवे नीट तपासून घ्यायला हवेत. कारण सद्यस्थितीत दोन हजारांच्या नोटा बदलण्यास किंवा जमा करण्यास कोणत्याही मुदतवाढीची शक्यता नसल्याने ही शेवटची संधी आहे. आरबीआयने आपल्या आदेशात स्पष्टपणे म्हटलं आहे की, जोपर्यंत या नोटा चलनात आहेत तोपर्यंत नागरिक या नोटांचा वापर करुन व्यवहार करु शकतात. मात्र शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी, लोकांनी ३० सप्टेंबर पूर्वी नोटा जमा किंवा बदलण्याचे आवाहनही आरबीआयने केले आहे.

नोटा लवकरच बदलून घ्या

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसात बँकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन नागरिकांनी वेळेवर नोटा बदलून घेणे आवश्यक आहे. २ हजार रुपयांच्या नोटा नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनात आल्या होत्या. त्यानंतर नोटाबंदीच्या काळात ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या. यावेळी अर्थव्यवस्थेतील चलनाची गरज भागवण्यासाठी सरकारकडून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. मे महिन्यात दोन हजाराच्या या नोटेवरील बंदीच्या घोषणेनंतर ३१ ऑगस्ट पर्यंत मोठ्या प्रमाणात दोन हजाराच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असून दोन हजार रुपयांच्या जवळपास ९३ टक्के नोटा बँकांमध्ये जमा झाल्याने खूपच कमी नोटा चलनात राहील्या असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या परिपत्रकात दिलेली आहे. त्यामुळे गृहिणींनी नोटा बदलण्यास मुदतवाढ मिळणार नाही हे गृहीत धरूनच आपल्याकडील नोटा बदलून घेणे आवश्यक आहे.

- Advertisement -

बॅकांमध्येही आवक रोडावली

दोन हजारांच्या नोटांच्या बंदीची घोषणा झाल्यानंतर मे, जून व जुलै महिन्यात बँकां व पतसंस्थांमध्ये दोन हजारांच्या नोटांचा भरणा होत होता. मात्र ऑगस्ट महिन्यापासून यात क्रमशः घट होत गेल्याने बहुतांश बँकांमध्ये दोन हजारांच्या नोटा अभावानेच जमा होतांना दिसत आहेत. सप्टेंबर महिन्यात तर हे प्रमाण अत्यल्प झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -