घरमहाराष्ट्रसर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्र ठरविले तर..., अजित पवार यांनी मांडले गणित

सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्र ठरविले तर…, अजित पवार यांनी मांडले गणित

Subscribe

नागपूर : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra political crisis) निकाल कधी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले नऊ महिने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने यावरील निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवले तर, काय होईल, याबाबत तर्कवितर्क मांडण्यात येत आहेत. त्याबाबत माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader Ajit Pawar) यांनी गणितच मांडले.

गेल्या वर्षी जून महिन्यात विधान परिषद निवडणुकीनंतर तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार अचानक थेट गुजरातला निघून गेले. ते का निघून गेले? याची चर्चा सुरू झाली. अखेर भाजपाच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याचे स्पष्ट झाले. तेथून शिवसेना फुटीचा प्रवास सुरू झाला. शिवसेनेचा एक-एक आमदार शिंदे यांच्या गटात सामील होत गेला. त्याचवेळी महाविकास आघाडीने तातडीची बैठक बोलावली. या बैठकीचा व्हीप जारी करण्यात आला. या बैठकीला एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेले 16 बंडखोर आमदार उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शिवसेनेने त्यांना अपात्र ठरविण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे याचिका सादर केल्या. त्यावर बाजू मांडण्याबाबत संबंधित आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या. त्याचदरम्यान 16 बंडखोर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षाविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस जारी केली.

- Advertisement -

या दोन्ही नोटिशींचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचला. त्यावर सुनावणी सुरू असतानाच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले. तेही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचले. याच गोंधळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आले.

आता सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य 16 आमदारांना अपात्र ठरवले तर, काय होईल, याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारले असताना त्यांनी गणित मांडून हे सरकार बहुमतातच राहील, असे सांगितले. आजच्या घडीला भाजपाचे 105 आणि त्यांना समर्थन देणारे अन्य 10 आमदार असल्याने त्यांचे संख्याबळ 115 आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे 40 आणि अन्य 10 आमदार आहेत. अपक्ष आमदार हे बहुतांश सत्ताधाऱ्यांबरोबरच राहतात. त्यामुळे आजच्या घडीला 165 संख्याबळ सत्ताधाऱ्यांकडे आहे, त्यातून 16 वगळले तरी, 149 आमदार राहतात, असे सांगत विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे अजित पवारांनी सूचित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -