घरताज्या घडामोडीपाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप! रात्री ९ पर्यंत १७,७९७ गणेशमूर्तींचे विसर्जन

पाच दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप! रात्री ९ पर्यंत १७,७९७ गणेशमूर्तींचे विसर्जन

Subscribe

मुंबईकरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाला न जुमानता यंदा मोठ्या जल्लोषात, वाजतगाजत, फटाके फोडत आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘ गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’ असा जयघोष करीत पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला विसर्जनस्थळी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

गिरगाव, जुहू, दादर चौपाटी, कुर्ला येथील शीतल तलाव, पवई तलाव, सायन तलाव आदी विसर्जन स्थळी आणि ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. मुंबई महापालिकेने विसर्जन स्थळी जय्यत तयारी केली आहे. ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी जीवरक्षक, मोटार बोट, नियंत्रण कक्ष, मोबाईल टॉयलेट, निरीक्षण मनोरे, वैद्यकीय मदत, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका, निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य कलश आदींची व्यवस्था केली होती. सुरक्षितततेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी व रस्त्यावर अगदी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे पालिकेने यंदा शहर व उपनगरातील २४ विभागात १५२ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून अनेक गणेश भक्तांनी घराजवळील या कृत्रिम तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

- Advertisement -

गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला बघताबघता पाच दिवस कधी झाले ते गणेश भक्तांनाही कळले नाही. दररोजची सकाळ व संध्याकाळची आरती व आरतीचे वातावरण, गणरायाचा मोठमोठ्याने केलेला जयघोष अशा प्रसन्न वातावरणात गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद लुटणाऱ्या हजारो गणेशभक्तांना लाडक्या गणरायाला पाचव्या दिवशी भावपूर्ण निरोप देताना गहिवरून आले. डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर महिला व बच्चे कंपनीला गणरायाला निरोप देताना काहीसे जड झाले.

रविवार सुट्टीचा वार असल्याने गणेश भक्तांनी दुपारपासूनच गणरायाला निरोप देण्यासाठी पूर्वतयारीला सुरुवात केली. विसर्जन स्थळी दुपारी ३ पर्यंत फक्त ४ सार्वजनिक गणेशमूर्तींचे, ६९८ घरगुती गणेशमूर्तींचे व १० हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. मात्र संध्याकाळच्या सुमारास गणेशमूर्ती विसर्जनाचे प्रमाण वाढत गेले. मुंबईतील नैसर्गिक व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३,९१९ गणेशमूर्तींचे व १५ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. या एकूण विसर्जनात ६६ सार्वजनिक तर ३,८५३ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश होता. रात्री ९ वाजेपर्यंत एकूण १७,७९७ गणेशमूर्तींचे व २३ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.

- Advertisement -

मुंबई शहर व उपनगरात हजारो भक्तगणांनी पाच दिवसांच्या गणरायाची वाजतगाजत विसर्जन मिरवणूक काढली. अनेकांनी घरापासून विसर्जन स्थळी पायी चालत व रस्त्याने गणपतीचा जयघोष करीत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. अनेकांनी सजवलेल्या चारचाकी हातगाडीवर गणरायाची मूर्ती ठेवून जल्लोषात विसर्जन केले. तर कोणी रिक्षा, चारचाकी कार, टेम्पो आदी वाहनांमधून श्रीगणेशाची मूर्ती बसवून गुलाल उधळत आणि गाण्यांच्या तालावर नृत्य करीत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला.

मुंबापुरीत असे झाले गणेश विसर्जन

मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत पाच दिवसांच्या एकूण १७,७९७ गणेशमूर्तींचे व २३ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.
यामध्ये, सार्वजनिक २६१ गणेशमूर्तींचा व १७,५३६ घरगुती गणेशमूर्तींचा समावेश आहे. एकूण गणेश विसर्जनात नैसर्गिक विसर्जन स्थळी १३० सार्वजनिक गणेशमूर्तींचे, १०,७१८ घरगुती गणेशमूर्तींचे अशा १०,८४८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच, ७ हरतालिकांचेही विसर्जन करण्यात आले. त्याचप्रमाणे, एकूण विसर्जनात, कृत्रिम तलाव विसर्जन स्थळी
१३१ सार्वजनिक गणेशमूर्तीचे व ६,८१८ घरगुती मूर्तींचे अशा एकूण ६,९४९ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच,१६ हरतालिकांचेही विसर्जन करण्यात आले.


हेही वाचा : आनंदाची बातमी! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत ९८ टक्के पाणीसाठा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -