घरठाणेकेडीएमसीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक, ठाकुर्लीत ज्येष्ठ नागरिकाची केली होती लूट

केडीएमसीच्या तोतया अधिकाऱ्याला अटक, ठाकुर्लीत ज्येष्ठ नागरिकाची केली होती लूट

Subscribe

डोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात एका ज्येष्ठ नागरिकाला तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान का करता? असे प्रश्न करत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एका तोतया अधिकाऱ्याने दमदाटी करून त्या ज्येष्ठ नागरिकाकडून ७ हजार ६०० रुपयांची लूट केली होती. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. टिळकनगर पोलिसांनी ठाकुर्ली ९० फुटी रस्ता व ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला उल्हासनगर येथून अटक केली.

ठाकुर्ली भागातील एक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर एका खासगी कंपनीत नोकरीला जातात. गेल्या महिन्यात रस्त्याने जात असताना ते धुम्रपान करत होते. त्यावेळी त्यांना समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोन जणांनी अडविले. आम्ही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आहोत. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान कसे काय करता? कायद्याने हा गुन्हा आहे, तुम्ही कायद्याचा भंग केला आहे, म्हणून तुम्ही आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चला, असे चढ्या आवाजात बोलून ज्येष्ठ नागरिकाला घाबरविले. तुम्हाला तात्काळ दंड भरावा लागेल.

- Advertisement -

तुमच्या खिशात किती पैसे आहेत ? असे विचारुन ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील पाकिटातून त्यांचे बँक डेबीट कार्ड काढून घेतले. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील एका एटीएममध्ये जाऊन दोन्ही भामट्यांनी या ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यामधून ७ हजार ६०० रुपये काढून घेतले. एटीएमबाहेर येऊन ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे कार्ड परत करुन तुम्ही आता आमच्यासोबत पोलीस ठाण्यात चला, असे म्हणून दुचाकीवरुन सुसाट वेगाने पळून गेले. या ज्येष्ठ नागरिकाला संशय आल्याने त्यांनी फसवणुकीप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक व ९० फुटी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन जण दुचाकीवरुन आल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. एका खासगी गुप्तहेराने हे आरोपी उल्हासनगरमधील रहिवासी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना दिली.त्यानुसार पोलिसांनी आरोपींचे उल्हासनगर येथील त्याचे घर शोधून व पाळत ठेऊन सोमनाथ बाबुराव कांबळे (२७ ) याला अटक केली आहे. सोमनाथने आपल्या साथीदाराच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी भामट्यांकडून लुटीची ३ हजार ८०० रुपयांची रक्कम हस्तगत केली. पोलीस आरोपीच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : चांदणी चौकातील वाहतूक समस्या सोडविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -