घरमहाराष्ट्रजेवणाअभावी १६५० नागरिकांवर उपासमारीची वेळ; पवई क्वारंटाईन सेंटरमधील प्रकार

जेवणाअभावी १६५० नागरिकांवर उपासमारीची वेळ; पवई क्वारंटाईन सेंटरमधील प्रकार

Subscribe

पवईतील एमएमआरडीएच्या इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरमधील सुमारे १६५० नागरिकांवर रविवारी उपाशी राहण्याची वेळ आली.

क्वारंटाईन सेंटरमधील अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वी आल्या आहेत. मात्र आता तर क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांवर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. पवईतील एमएमआरडीएच्या इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरमधील सुमारे १६५० नागरिकांवर रविवारी उपाशी राहण्याची वेळ आली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इमारतीखाली उतरून तेथील पोलीस आणि कर्मचाऱ्यांना घेराव घातला. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांवर ऑनलाईन जेवण मागवण्याची वेळ आल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

पवईतील हिरानंदानी येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटरच्या मागे असलेल्या एमएमआरडीएच्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये एस वार्डमधील विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग, पवई या भागातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. २२ मजली असलेल्या या इमारतींमध्ये १६५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी इमारतीमधील १२ व्या मजल्यापर्यंतच्या नागरिकांना नाष्टा मिळाला, तर त्यावरील लोकांना नाष्टाच पोहचला नाही. त्यामुळे नागरिकांनी तिथे सेवा देण्यासाठी असलेल्या व्यक्तींकडे तक्रारही केली. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. दुपारच्या जेवणावळी मात्र कहरच झाला. दुपारी चार वाजले तरी जेवणच पाठवले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इमारतीमधून बाहेर येत सेंटरवरील कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी क्वारंटाईन सेंटरमधून रुग्ण नेणाऱ्या रुग्णवाहिकेलाच घेराव घातला, काहींनी क्वारंटाईन सेंटर प्रमुख सुशांत रत्नपारखी यांना धारेवर धरले. क्वारंटाईन सेंटरमध्ये लहान मुले, मधुमेहग्रस्तांसाठी त्यांनी तातडीने बिस्किटांची व्यवस्था केली. परंतु जेवणच न आल्याने नागरिकांवर दुपारी उपाशी राहण्याची वेळ आली. जेवण न मिळाल्याने इमारतीखाली लोकांनी गर्दी केल्याने सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा उडाला. जेवणाची वाट पाहून अखेर ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी ऑनलाईन जेवण मागवल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड तर सहन करावाच लागला पण उर्वरीत नागरिकांवर रविवारी उपासमारीची वेळ आली. गेल्या काही दिवसांपासून खराब जेवण येत असल्याने सेंटरला जेवण पुरवणारा कंत्राटदार बदलण्यात आला होता. मात्र नवा कंत्राटदार असलेल्या महिला बचत गटाला पहिल्याच दिवशी जेवण पुरवण्यात सपशेल अपयश आले. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचे मात्र हाल झाले.

- Advertisement -

जेवण पुरवण्याचे काम रविवारपासून एका महिला बचत गटाला दिले होते. पण त्यांना ते जमले नाही. त्यांनी घोळ घातल्यामुळे आपण सायंकाळपासून जुन्या कंत्राटदाराला पुन्हा काम देत आहोत. लोकांना तातडीने जेवण पुरवण्याची आम्ही व्यवस्था केली आहे.
– संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त, एस वार्ड, मुंबई महापालिका


हेही वाचा – चाकरमान्यांमुळे कोकणातील हॉटेल्स-शाळा हाऊस फुल्ल, जिल्हा प्रशासनाची वाढली डोकेदुखी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -