घरदेश-विदेशठाण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ चिंतेची बाब

ठाण्यात महिलांवरील अत्याचारात वाढ चिंतेची बाब

Subscribe

10 महिन्यात 1 हजार 400 बलात्काराच्या घटना , सहा महिन्यांपासून बलात्काराच्या गुन्ह्यांचा आलेख दुप्पट

देशात महिलांवर सामुहिक बलात्कार आणि त्यानंतर खुनाचे गुन्हे वाढत आहेत. ठाणे जिल्ह्यातही गेल्या 10 महिन्यात बलात्काराचे 1400 गुन्हे नोंद झाले असून, त्यापैकी 1266 गुन्ह्यांची उकल झाली आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून बलात्काराच्या गुन्ह्यांचा आलेख हा दुप्पटीने वाढताना दिसत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे ठाण्यात महिलांवरील अत्याचारातील वाढ ही चिंतेची बाब ठरत आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आदी शहरी भागाचा परिसर येतो. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या दहा महिन्यात 1400 महिलांवरील बलात्काराचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. जानेवारी ते एप्रिलपर्यंत महिलांवरील बलात्काराचे गुन्हे शंभरच्या पुढे गेले नव्हते. मात्र मे ते ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक महिन्याला पावणे दोनशेच्यापुढेच महिलांवरील बलात्काराचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. सहा महिन्यात महिलांवरील बलात्काराचे गुन्हे हे दुप्पटीने वाढले आहेत. गुन्हा नोंद झाल्यानंतर त्यांची उकलही शंभर टक्के नाही. आरोपी सापडत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आणखीनच वाढीस लागतो. शहरी भागातील ही आकडेवारी असली तरी सुद्धा ग्रामीण भागातही अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisement -

हैद्राबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची घटनेनंतर देश पुन्हा एकदा हादरून गेला आहे. यामधील आरोपी पळून जात असतानाच त्यांचा हैदराबाद पोलिसांनी एन्कांऊटर केला यावर देशभरातून दोन्ही बाजूने प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मात्र यापूर्वीही बलात्काराच्या घटनानंतर मोर्चे निघाले, आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी म्हणून मागणी झाली. मात्र या विकृत घटना थांबताना दिसत नाहीत.

बलात्काराच्या घटना

महिना -दाखल गुन्हे -उघडकीस गुन्हे

- Advertisement -

जानेवारी -30 -22
फेब्रुवारी -50 -44
मार्च -61 -55
एप्रिल -85 -73
मे -121 -104
जून -185 -169
जूलै -185 -169
ऑगस्ट -204 -187
सप्टेंबर -228 -214
ऑक्टोबर -252 -229

सामुहिक बलात्काराच्या घटनांमध्ये दोन ते तीन कारणे असू शकतात. असामाजिक व्यक्तीमत्व, व्यसनाधीनता आणि लहापणापासून घरातून योग्य संस्कार नसणे. दारू, चरस, गांजा एवढीच केवळ व्यसनाधीनता राहिलेली नाही. तर त्यात इंटरनेटचाही सहभाग वाढला असून, पोर्न व्हिडीओ पाहण्याचे प्रकारही वाढले आहेत. समाजात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. 21 व्या शतकातही उपभोग्य वस्तू हा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री पुरूष समानतेच्या केवळ गप्पा मारून उपयोग नाही. लहानपणापासून पालकांनी आणि शाळेतही मुलांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले पाहिजेत. विभिन्न व्यक्तींशी कसे वागायचे, मैत्री आकर्षण यातील फरक, लैंगिक भावनांना आवर कसा घालायचा या गोष्टींचे मार्गदर्शन शालेय जीवनातच मुलांना दिले गेले पाहिजे. शाळांमध्ये हे सुरू असले तरी व्यापक प्रमाणात होणे गरजेचे आहे.
-डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचार तज्ज्ञ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -