घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहामार्गासोबतच ट्रॅव्हल्स बसची तपासणी आवश्यक

महामार्गासोबतच ट्रॅव्हल्स बसची तपासणी आवश्यक

Subscribe

स्वप्नील येवले । पंचवटी

औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुलीवर शनिवारी (दि.८) पहाटेच्या वेळी झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू तर ४० हुन अधिक जखमी प्रवासांबद्दल राज्यासह देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत घटना स्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि कारवाईचे आदेश दिलेत. अपघात घडला आणि वरिष्ठांकडून आदेश आलेत म्हणून काही दिवसांपुरता कारवाईचे सोपस्कार पार पाडत कालांतराने सर्व पहिल्या सारखे मोकळे सोडून द्यायचे असे होणार असेल तर हि एक प्रकारे फसवणूकच आहे. पुन्हा भविष्यात एखादा भीषण अपघात घडत नाही तोपर्यंत कारवाई कडे लक्ष द्यायचे नाही असा प्रकार फक्त प्रादेशिक परिवहन विभागातच नाही तर सर्वच शासनाच्या विभागांमध्ये बघायला मिळतो.

- Advertisement -

काही दिवसांवर दिवाळी सण येऊ लागला असल्याने घरी गावी जाणार्‍यांची तयारी सुरू होते. त्यामुळे अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून या सण उत्सवात बंद स्थितीत पडलेल्या किंवा अपूर्ण कागदपत्रे असलेल्या ट्रॅव्हल्स बस रस्त्यावर उतरविल्या जात असल्याची माहिती काही बसचालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. कारण सणांमध्ये अनेकजण आपल्या घरी गावाकडे जाण्यासाठी निघणार असतात. त्यावेळी परिवहन महामंडळाच्या बस आणि रेल्वे कमी पडत असल्याने अनेकजण खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे पसंत करतात.दिवाळी निमित्त शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना काही दिवसांसाठी सुट्या मिळत असतात. त्या सुटीमध्ये अनेक कुटुंबिय एकत्र फिरायला जाण्याचे नियोजन करत असतात. अनेकांना रेल्वेचा प्रवास सुखकर वाटत असल्याने आणि कमी वेळ लागत आगाऊ रेल्वेचे तिकीट बुकिंग करतात. परंतु, काहीजणांनी ऐनवेळी केलेल्या नियोजनामुळे रेल्वेचं तिकीट मिळत नाही. शेवटी त्यांना खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागतो. मात्र, त्यावेळी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची आर्थिक लूट केली जात असल्याचे चित्र
बघायला मिळते.

खासगी ट्रॅव्हल्स वाले प्रवाशांकडून सणांच्या काळात अव्वाच्या सव्वा दराने भाडं आकारत असल्याने कायम नागरिकांच्या तक्रारी समोर येतात. त्यामुळे सण तोंडावर आलेला असताना भाडेवाढ आणि अवैध वाहतूक ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे. सणांच्या दरम्यान खासगी ट्रॅव्हल्स कडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि आकारल्या जाणार्या भरमसाठ तिकीट दराच्या विरोधात नागरिक अनेकदा परिवहन विभाग तसेच पोलिसांकडे तक्रारी दाखल करत असतात त्यावर तेवढ्या पुरता संबंधित विभागाची यंत्रणा कारवाईचे सोपस्कार पार पाडून आपली पाठ थोपटून घेत असल्याचे निदर्शनास येते. परंतु दरवर्षी होणार्‍या या घटनांकडे प्रशासन दुर्लक्ष का करते हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे.

- Advertisement -
एसटी बसची संख्या वाढवा

 एसटी महामंडळ देखील क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करते. त्यामुळे राज्य सरकारने देखील ज्या मार्गांवर जास्त प्रवासी आहेत. त्या मार्गांवर बसची संख्या वाढवावी. तसेच महामंडळांच्या बसचीदेखील देखभाल दुरुस्ती नियमित करावी. अनेकदा प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचा प्रवास करताना तांत्रिक अडचणींचा त्रास रस्त्यावर उभे राहून सहन करावा लागत असतो.

ट्रॅव्हल्सवर कारवाईची मागणी

 खासगी ट्रॅव्हल्सकडून सणांदरम्यान प्रवाशांकडून अव्वाच्यासव्वा भाडे घेणार्‍या तसेच नियमांच पालन न करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांवर कारवाई करावी. तसेच वाहनांमध्ये त्रुटी असतानाही चिरीमिरी घेऊन आपले खिशे भरत प्रादेशिक परिवहन तसेच पोलीस विभाग यांच्या आश्रयाने अनेक ट्रॅव्हल्स रस्त्यावर धावतांना दिसतात. आरटीओ पासींग करतंना अधिकारी फक्त कागदपत्रे तपासून स्वाक्षरी करत असल्याचे बोलले जात आहे. परंतु बसमध्ये असलेले अत्यावश्यक वेळी वापरण्यात येणारे दरवाजे आणि खिडक्या सुस्थितीत आहे का याची तपासणी केली जात नाही.

अर्थपूर्ण मैत्रीमुळे कारवाईची आधीच मिळते माहिती

 खासगी ट्रॅव्हल्सकडे परिवहन विभागाकडून कानाडोळा केल्या जात असल्याचाही आरोप केला जातो आहे. प्रशासनाने जर वेळेत याकडे लक्ष दिले असते तर असे अपघात घडले नसते. एवढंच नव्हे तर सर्व सामान्य नागरिकांना प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी दिल्या नंतर मोजक्या ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसवर कारवाई केली जाते. अनेक खासगी ट्रॅव्हल्स मालक आणि चालक यांचे परिवहन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी अर्थपूर्ण मैत्रीचे संबंध असल्याने कारवाई कधी व कुठे होणार याची माहिती अगोदरच दिली जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -