ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान; नाशिकमधील एकात्मतेचा संदेश देणारी देवस्थान

नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरावर संदल मिरवणुकीदरम्यान धूप दाखविण्याच्या धार्मिक परंपरेला राजकीय रंग देण्याचे काम काही पक्ष, संघटना आणि व्यक्तींकडून दिले जात आहे. मात्र त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील रहिवाशांनी अनेक धर्मस्थळांना यापूर्वीच ‘सर्व धर्म समभावा’चा रंग चढवलेला आहे. हा रंग इतका पक्का आहे की, तो पुसला जाणे शक्य नाही. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी नाशिक जिल्ह्यातील एकात्मतेला तडा जाणार नाही, असा विश्वास जिल्ह्यातील रहिवाशीच त्यांच्या कृतीतून देत आहेत. ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’चा संदेश देणार्‍या काही विशेष धर्मस्थळांबाबतचा ‘माय महानगर’चा हा स्पेशल रिपोर्ट..

नवशा गणपती मंदिर आणि दरगाह

आनंदवली परिसरातील ’नवशा गणपती’ मंदिर नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच ’हजरत पीर सय्यद संझेशाह हुसैनी शहीद’ यांची दरगाह आहे. दरगाह व मंदिर जरी शेजारी असले तरी त्यांच्यात आजतागायत कधीही वाद झालेला नाही. या दोन्ही संस्थांमार्फत ’रामरहीम’ मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ती धार्मिक कार्यक्रम करणारी संस्था नसून त्याद्वारे सामाजिक कार्य केले जाते. अनेक हिंदू लोक दर्ग्यात जाऊन नतमस्तक होतात तर मुस्लीमही नवशा गणपतीसमोर नवस करीत असल्याचे अनुभव आहेत.

घंटी म्हसोबा मंदिर

नाशिक-पुणे रोडवरचे घंटी म्हसोबा मंदिर एक मोठे उदाहरण आहे. या ठिकाणी भारताततून अनेक धर्माचे लोक दर्शनासाठी येत असतात. येथे भाविक आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हसोबाला घंटी वाहीन असा नवस बोलतात व इच्छा पूर्ण झाल्यावर येथे आपल्या ऐपतीप्रमाणे घंटी वाहतात. हजारो साईभक्त सायंकाळी द्वारका येथून नाशिक-पुणे महामार्गाने सिन्नरच्या दिशेने रवाना होत असताना रस्त्यात घंटी म्हसोबाजवळ थांबतात. तेथे विधीवत आरती करतात. त्यानंतर पालखीत सहभागी झालेले भक्त आपल्या इच्छेप्रमाणे नवस बोलतात. पालखी सोहळ्याला मुंबईतील अनेक जाती-धर्माचे लोक सहभागी झालेले असतात. त्यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन अशा अनेक धर्मीयांचा समावेश असतो.

मीरा दातार दर्गा व मंदिर

पंचवटीतील के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेज परिसरातील मीरा दातार दर्गा व मंदिराची बारा वर्षांपूर्वी स्थापना झाली. वरवर एखाद्या रहिवासी इमारतीसारख्या दिसणार्‍या या वास्तूत प्रवेश केल्यानंतर खाली दर्गा आणि वरच्या बाजूला समोर कृष्ण मंदिर अशी रचना आहे. सय्यद मीरा अली दातार यांच्या नावावरून या स्थानाला मीरा दातार नाव देण्यात आले. स्वतः सय्यद मीरा अली दातार हे कृष्णभक्त होते. त्यामुळे दोन्ही स्थाने एकाच ठिकाणी केल्याची माहिती ट्रस्टी देतात. प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी भंडार्‍याचा कार्यक्रम होतो. व्याधीमुक्तीसाठी भाविक येथे येऊन धागा बांधतात. विशेष म्हणजे हिंदू, मुस्लिम, शिख अशा सर्वच धर्माचे लोक इथे येतात आणि मनोभावे संकल्प सोडतात.

मनुदेवीचे मंदिर – धोंडपीर मंदिर

आडगाव शिवारात जकात नाक्यापासून काही अंतरावर एका लहानशा टेकडीवर श्री मनुदेवीचे मंदिर आहे आणि बाजूलाच धोंडपीर मंदिर आहे. पुढे पीरबाबा व पाठीमागे साईबाबा आणि श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे. मनुदेवी ही खान्देशवासीयांची कुलदेवता. तिचं मूळस्थान यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेत आहे. आडगावातील मनुदेवीच्या मूर्तीची स्थापना जगद्गुरू शंकराचार्यांच्या हस्ते झाल्याचे भाविक सांगतात. खान्देशातून नाशिकला वडनेरे, लेवा पाटील, राणे, पिंगळे, देशमुख असा मोठा वर्ग स्थलांतरीत झाला आहे. ते या ठिकाणाला खूप मानतात. या ठिकाणी नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. अर्थात मनुदेवी, गुरुदत्त, साईबाबा व धोंडपीर या सर्वांचं एकत्रित दर्शन होत असल्याने या ठिकाणी वर्षभर सर्व धर्माच्या भाविकांची वर्दळ असते.

बाल येशूचे चर्च

ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेले बाल येशूचे चर्च नाशिकरोडला आहे. बाल येशूची यात्रा जगात झकोस्लाव्हिया देशाच्या प्राग शहरात व नाशिकरोड येथेच ही यात्रा भरते. या यात्रेला परदेशातूनही भाविक नाशिकमध्ये येतात. बालयेशूच्या दर्शनाला केवळ ख्रिच्छनच नव्हे तर अन्य धर्मियांचीही गर्दी असते.

पांडव लेणी

शहराच्या प्रवेशव्दारावर असलेल्या पांडवलेणी परिसरात रोजच सर्वधर्मियांची मांदियाळी दिसून येते. पांडव लेणी प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या हीनयान व महायान पंथांच्या कालखंडात खोदण्यात आली. येथे एकूण २७ ब्राह्मी शिलालेख कोरले असून त्यातून सातवाहन व पश्चिमी क्षत्रप (क्षहरात) यांच्या इतिहासाविषयी उपयुक्त माहिती मिळते.

मांगीतुंगी राष्ट्रीय एकात्मता

मांगीतुंगी हे जैन धर्मियांचे दुसर्‍या क्रमांकाचे प्राचीन सिद्धक्षेत्र आहे. या तीर्थक्षेत्राला दरवर्षी हजारो संख्येने भाविक भेट देतात. पर्वतावर प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान ऋषभदेव यांची १०८ फुटी अखंड पाषाणातील मूर्ती आहे. या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांची गर्दी असते.

पीर बाबांची समाधी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी हिंदू धर्मिय पीर बाबांच्या समाधीचे पूजन करतात. नवस फेडण्यापासून घरातील मोठ्या मुलाची शेंडी कापण्यापर्यंतच्या विधी या समाधीस्थळावर केले जातात.