घरठाणेमाणुसकी जपणारी विज्ञानवादी वृत्ती जोपासली पाहिजे - न्या. सत्यरंजन धर्माधिकारी

माणुसकी जपणारी विज्ञानवादी वृत्ती जोपासली पाहिजे – न्या. सत्यरंजन धर्माधिकारी

Subscribe

ठाणे : भारतीय संविधानात नमूद असलेल्या न्याय, समता आणि बंधुता या तीन मूल्यांचा अंगीकार करणे हे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. मात्र हक्क मिळवताना आपल्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला आहे. माणूसकी जोपासणारी विज्ञानवृत्ती, चौकस दृष्टिकोन आणि स्वतःत सुधारणा करत चांगले बदल घडवून आणण्याची सवय मनाला जाणीवपूर्वक लावणे ही आजच्या काळाची गरज आहे, असा स्पष्ट विचार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात मांडला.

मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माइंड जिम “संस्कार विज्ञान सोहळ्या’चा शुभारंभ शुक्रवार, ६ जानेवारी रोजी ठाण्यात न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि जेष्ठ विचारवंत, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ विचारवंत व स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप वासलेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

- Advertisement -

यावेळी न्या. धर्माधिकारी म्हणाले की, दहशतवादाची आणि युध्दाची सुरुवात माणसाच्या मनातूनच होते याची प्रचिती आपण वारंवार घेत आहोत. आपली वृत्ती संकुचित आहे का? स्वभाव हिंसक आहे का? हे प्रश्न आपण आपल्याला विचारले पाहिजेत. चांगल्या बदलाची सुरुवात ही स्वतःपासूनच होते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक मनाची मशागत केली पाहिजे हेच मनशक्ती आपल्या कार्यातून सांगू पाहते आहे, असे सांगत धर्माधिकारी यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर केवळ मनाच्या सामर्थ्याने वैश्विक बदल घडवता येऊ शकतात हे आपण स्वानुभवावरून ठाम सांगू शकतो, असे ज्येष्ठ विचारवंत संदीप वासलेकर यांनी सांगितले.

ऐंशीच्या दशकात इंटरनेट सारखे कोणतेही माध्यम हाताशी नसताना, ग्रंथालय किंवा विचारवंतांशी चर्चेचे साधन नसतानाही केवळ विचारातून लिहिलेला जागतिक अर्थव्यवस्थेतील त्रुटी आणि त्यावरच्या उपाययोजना या विषयावरील निबंधाला जागतिक बँकेच्या अध्यक्षानी प्रतिसाद दिला. याच जोरावर ऑक्सफर्ड विद्यापिठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथे शिक्षण पूर्ण करता आले, ही व्यक्तीगत आठवण त्यांनी सांगितली. याचाच अर्थ व्यक्तिगत मनाच्या पातळीवर केलेला विचार राष्ट्र आणि पूर्ण मानवतेला जोडून घेऊ शकतो. व्यक्ती, राष्ट्र आणि मानवतेला जोडून घेणारी ही वैचारिक बैठक, संस्कार देणारे मनशक्तीचे कार्य खरोखरच महत्वाचे असल्याचे वासलेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

मनशक्तीच्या संस्कार विज्ञान सोहळ्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मनाची शक्ती, संस्कारांचे महत्त्व आणि त्यामागील विज्ञान तपशीलात समजून घेता आले, अशी भावना भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली. हल्ली कर्मकांडाबद्दल उलटसुलट टीका केली जाते. प्रत्येक संस्कार वा प्रथा म्हणजे कर्मकांड आहे असे गृहीत न धरता त्यामागचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विज्ञानाचा देखील संस्कार असतो, हे समजून उमजून घेऊन केलेली कृती महत्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले. मन माऊलीचे महत्व सगळ्यांना समजावून सांगणारा सामाजिकत्वाच्या विकासाचा हा उपक्रम आहे, अशा शब्दांत त्यांनी मनशक्तीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मनशक्तीचे कार्यकारी विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, मनशक्ती यंत्र चाचणी विभागाचे प्रमुख आणि विश्वस्त गजानन केळकर आदी उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -