घरमहाराष्ट्रआयटीआय विद्यार्थी दहावी आणि बारावी समकक्ष

आयटीआय विद्यार्थी दहावी आणि बारावी समकक्ष

Subscribe

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयमध्ये व्यवसाय विषय घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. विद्यार्थ्यांना समकक्षता देण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
जे विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले नाहीत आणि ज्या विद्यार्थ्यांनी आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमाची अर्हता दहावी अनुत्तीर्ण आहे, असे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करतील अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिटस देण्यात येतील. आयटीआयमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमांची शैक्षणिक अर्हता दहावी अनुत्तीर्ण अशी आहे. त्याऐवजी ती यापुढे दहावीच्या गुणपत्रिकेतील बदलामुळे कौशल्य विकासास पात्र, असे नमूद करण्यात येईल. याचबरोबर जे विद्यार्थी दहावीत उत्तीर्ण झाल्यानंतर आयटीआयमध्ये ज्या अभ्यासक्रमांची प्रवेश अर्हता इयत्ता दहावी अशी आहे, असा दोन वर्षांचा व्यवसाय अभ्यासक्रम आयटीआयमधून उत्तीर्ण करतील त्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी प्रमाणपत्राच्या समकक्षतेकरिता क्रेडिट्स देण्यात येतील.

आयटीआयमधील इच्छुक विद्यार्थ्यांना राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी अथवा बारावी प्रमाणपत्र परीक्षेकरिता नोंदणी करता येईल. आयटीआयमधील विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेकरिता जास्तीत जास्त ४ व्यवसाय विषयांचे क्रेडिटस घेता येतील. आयटीआयमधील व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे कमाल गुणांचे रुपांतर राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता कमाल ४०० गुणांमध्ये करता येईल.
विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीत उत्तीर्ण होण्याच्या विषयांच्या गरजेनुसार कमाल ४ व्यवसाय विषयांची (कमाल ४०० गुण) निवड दहावी आणि बारावीच्या समकक्षतेकरिता क्रेडिटस प्राप्त करण्याकरिता करता येईल. तसेच या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या सर्वोत्तम ५ (बेस्ट ऑफ फाईव्ह) योजनेचा लाभ मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -