घरदेश-विदेशकोणत्या विषयांवर चर्चा केल्याची माहिती नाही, पण...; पवार-मोदींच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

कोणत्या विषयांवर चर्चा केल्याची माहिती नाही, पण…; पवार-मोदींच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यासह देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. या दोन नेत्यांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंबंधीत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्या विषयांवर चर्चा झाली यासंबंधीत माहिती दिली आहे. तसंच, या भेटीची पूर्वकल्पना होती असं देखील जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील हे साताऱ्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पवार-मोदी भेटीवर भाष्य केलं. शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटणार याची कल्पना होती. सहकार क्षेत्राशी संबंधित प्रकरणावर पवार आणि मोदींमध्ये चर्चा झाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. “देशातल्या वेगवेगळ्या भागातल्या सहकार बॅकिंग क्षेत्रातील लोकांनी गेल्या दीड महिन्यात अनेक निवेदनं पाठवली, लोकं भेटली. या सगळ्याचा सार करुन केंद्र सरकारने यात लक्ष घातले पाहिजे. रिझर्व्ह बँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, यासाठी शरद पवार मोदींना भेटायला गेले. शरद पवार यांनी शक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना माजी संरक्षण मंत्री या नात्याने कामासंदर्भात माहिती दिली. कोणत्या विषयाची चर्चा केली याचा माझ्याकडे तपशील नाही. पण शरद पवार यांनी सांगितलं होतं की हे सगळे प्रश्न घेऊन पंतप्रधान यांची वेळ मागितली आहे आणि या प्रश्नांसाठी मी त्यांना भेटणार आहे.”

- Advertisement -

पवार-मोदींमध्ये तासभर खलबतं

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आज दिल्लीत भेट झाली. या भेटीत दोन नेत्यांमध्ये तब्बल तासभर खलबतं झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -