घरमहाराष्ट्रनाशिककेदा आहेर, सकाळे, खेमनारांच्या पॅनलचा झेंडा

केदा आहेर, सकाळे, खेमनारांच्या पॅनलचा झेंडा

Subscribe

जिल्हा मजूर संघ निवडणूक : भोसलेंच्या पॅनलला पराभव

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत केदा आहेर, संपतराव सकाळे व राजाभाऊ खेमनार यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवत राजेंद्र भोसलेंच्या पॅनलचा पराभव केला. विशेष म्हणजे संघाचे विद्यमान अध्यक्ष दिनकर उगले यांना पराभवाची धुळ चारत भारत कोकाटे यांची ‘एन्ट्री’ झाली आहे. तीन वेळा संचालक राहिलेले योगेश हिरेंचा दारुन पराभव झाला.

मजूर संघाच्या एकूण 20 जागांपैकी 8 जागा बिनविरोध झालेल्या असल्यामुळे 12 जागांसाठी रविवारी (दि.25) मतदान घेण्यात आले. द्वारका परिसरातील काशीमाळी मंगल कार्यालयात सोमवारी (दि.26) निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश महंत यांच्या नेतृत्वात मतमोजणी झाली. सिन्नर तालुक्यात आमदार अ‍ॅड.माणिकराव कोकाटे यांना तर, येवल्यात आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे यांना धक्का बसला. तर माजी मंत्री छगन भुजबळांसह माजी आमदार राजाभाऊ वाजे, शिरीषकुमार कोतवाल, उदय सांगळे यांची सरशी झाली आहे. प्रारंभी तालुका संचालकांचा निकाल घोषित झाला. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकारिणीतील नऊ संचालक पुन्हा निवडून आले आहेत. तर मजूर संघाच्या इतिहासात प्रथमच चार महिलांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करुन उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.

- Advertisement -

सकाळेंनी केला चुंभळेंचा प्रचार

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वादातून माजी सभापती शिवाजी चुंभळे व माजी उपसभापती संपतराव सकाळे यांचे संबंध दुरावले होते. अगदी जवळचे नातेसंबंध असताना केवळ राजकीय द्वेशातून दोन्ही कुटुंबांमध्ये निर्माण झालेला दुरावा जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीत भरुन निघाला. निवडणुकीतून माघार घ्यायला निघालेले अर्जून चुंभळे यांना संपतराव सकाळे यांनी उमेदवारी करायला भाग तर पाडलेच शिवाय त्यांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला. या निवडणुकीच्या निमित्ताने पंचायत समितीचे माजी सभापती रत्नाकर चुंभळे व शिवाजी चुंभळे यांच्यातील राजकीय कटुता दुर झाल्याचे बोलले जाते.

आमदार कोकाटेंना धक्का; भारत कोकाटे विजयी

मविप्र निवडणुकीपासून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू भारत कोकाटे यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. भारत कोकाटेंनी सिन्नर तालुक्यातून उमेदवारी करत आमदार कोकाटेंचे समर्थक दिनकर उगले यांचा दोन मतांनी पराभूत केले. या निकालामुळे आमदार कोकाटेंचा अप्रत्यक्ष पराभव झाल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

योगेश (मुन्ना) हिरेंचा दारुन पराभव

जिल्हा मजूर संघाच्या निवडणुकीत सलग तीन वेळा विजयी झालेले ज्येष्ठ संचालक योगेश हिरे यांचा या निवडणुकीत दारुन पराभव झाला. भाजपचे नगरसेवक जगदीश पाटील यांच्या नात्यातील शर्मिला कुशारे यांनी त्यांना पराभूत केले. त्यांना तीसर्‍या क्रमांकाची मते मिळाली.

खेमनार ठरले जायंट किलर

राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, प्रमोद मुळाणे यांनी जिल्हाभर फिरुन राजाभाऊ खेमनार यांच्या पराभवासाठी जंगजंग पच्छाडले. मात्र, राजाभाऊ खेमनार या सर्वांना पुरुन उरत तब्बल 116 मतांच्या फरकाने दणदणीत विजयी झाले. त्यामुळे खर्‍या अर्थाने ते जायंट किलर ठरले. त्यांच्या विजयात संपतराव सकाळे, कृष्णराव पारखे यांचे विशेष योगदान राहिले.

जिल्हा मजूर सहकारी संघाच्या निवडणुकीची खास वैशिष्ठ्ये

  • देवळा तालुक्यातील सुभाष गायकवाड व सुनील देवरे या दोन उमेदवारांना शून्य मतदान
  • येवल्यात माजी पालकमंत्री छगन भुजबळ गटाची सरशी; दराडे बंधु समर्थकांना पराभवाचा धक्का
  • संपतराव सकाळेंच्या नेतृत्वाला यश; राजेंद्र भोसलेंच्या बहुतेक उमेदवारांचा पराभव
  • पेठला विनायक माळेकरांचा करिष्मा कायमे
  • संघात प्रथमच ४ महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले; शर्मिला कुशारे,खेमनार ठरले जायंट किलर
  • एनटी गटात शशिकांत आव्हाड यांची उमेदवारी नाकारल्याने भोसलेंच्या उमेदवाराचा दारुन पराभव
उमेदवारांना मिळालेली मते
  • ओबीसी : अर्जून चुंभळे (३८२), पवन अहिरराव (३०९)
  • एससी-एसटी : शशिकांत उबाळे (४०४), किरण निरभवणे (३९०)
  • महिला (२) : दिप्ती पाटील (७२६), कविता शिंदे (६४८)
  • एनटी : राजाभाऊ खेमनार (४११), सुदर्शन सांगळे (३०१)
  • पेठ : सुरेश भोये (६), मनोज धुम ५)
  • चांदवड: शिवाजी कासव (३०), शरद आहेर (२६)
  • देवळा: सतिश सोमवंशी (४४)
  • सुरगाणा: राजेंद्र गावित (१२), आनंदा चौधरी (८)
  • सिन्नर : भारत कोकाटे (३२), दिनकर उगले (३०)
  • येवला : सविता धनवटे (५४), मंदा बोडके (३४)
  • नाशिक: शर्मिला कुशारे (८५), उत्तम बोराडे (७४)

बिनविरोध निवडून आलेले संचालक

  • त्र्यंबकेश्वर : संपतराव सकाळे
  • बागलाण: शिवाजी रौंदळ, दिंडोरी : प्रमोद मुळाणे
  • मालेगाव : राजेंद्र भोसले, निफाड : अमोल थोरे
  • इगतपुरी : ज्ञानेश्वर लहाने, कळवण : रोहित पगार
प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -