घरमहाराष्ट्रपवारांनी शिवसेना फोडली

पवारांनी शिवसेना फोडली

Subscribe

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचा आरोप

शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी नवी दिल्लीत बोलताना केला. शरद पवार यांनी अनेकदा खासगीत बोलताना शिवसेनेच्या फुटीबाबत सांगितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

येत्या १८ जुलै रोजी होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी दिल्लीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या वतीने सहभागी झालेल्या केसरकर यांनी
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली.

- Advertisement -

नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी पवारांनी मदत केली होती, मात्र राणे यांनी कोणत्या पक्षात जावे याबाबत कोणतीही सूचना केली नव्हती, असेही पवारांनी सांगितल्याचे केसरकर म्हणाले. छगन भुजबळ यांना स्वत:च शरद पवारांनी शिवसेनेतून बाहेर नेले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठीशी शरद पवार यांचे आशीर्वाद होते, असे सूचक विधानही त्यांनी केले. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना का दिल्या हे शरद पवार यांनी जनतेला सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसैनिकांनी विचार करावा
अडीच वर्षांत राष्ट्रवादीला टॉनिक मिळाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नेत्यांकडून तसे जाहीरपणे सूतोवाचही केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेच्या पालखीचे भोई होणे शिवसैनिकांना पटणार आहे का याचा विचार शिवसैनिकांनी करावा, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले.

- Advertisement -

केसरकर यांचे विधान बेजबाबदारपणाचे : तपासे
दरम्यान, बेकायदेशीर शिंदे सरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दीपक केसरकर यांचे विधान बेजबाबदारपणाचे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणार्‍या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे. शरद पवार यांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचे तपासे म्हणाले.

शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे केसरकर यांना माहीत नसावी. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही तपासे यांनी केसरकर यांना करून दिली आहे.

आहात तिथेच सुखी रहा
अहो केसरकर किती बोलता पवार साहेबांविरूद्ध. एकेकाळी पवारांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? २०१४ ला मीच आलो होतो, साहेबांचा निरोप घेउन. जिथे आहात तिथेच सुखी रहा, खाजवून खरूज करू नका.
जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी

युती मानापमानावर अडकली
पहिला फोन कुणी करायचा यावरूनच भाजप आणि शिवसेनेची युती खोळंबली. भाजप आणि शिवसेनेची युती मानापमान नाट्यावर अडकलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजही शिवसेनेतच आहेत. राज्यात आजही शिवसेना आणि भाजपचेच सरकार आहे.
– दीपक केसरकर, आमदार

सुधीर मुनगंटीवार
आमच्याकडून फोन जाण्याचा प्रश्नच येत नाही. कारण उद्धव ठाकरे हे आजही मविआमध्ये आहेत.
– सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप

केसरकर तुम्ही जास्त बोलू नका निलेश राणे
दीपक केसरकर कुठे तरी बोललेत राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत. त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण युतीमध्ये आहोत. विसरू नका. जेवढी युती टिकवायची जबाबदारी आमच्यावर आहे, तेवढी तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदेंच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाहीत. तुम्हाला कुबड्या मिळाल्यात त्या कुबड्यांवर चाला. नाहीतर मतदारसंघातून तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरे राजकीय जीवनदान मिळाले आहे हे विसरू नका आणि इज्जत मिळते ती घ्यायला शिका. नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही, असा धमकीवजा इशाराच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणेंनी केसरकरांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -