घरमहाराष्ट्रकर्णबधिर आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी होणार - दिलीप कांबळे

कर्णबधिर आंदोलकांवरील लाठीचार्जची चौकशी होणार – दिलीप कांबळे

Subscribe

नोकरी आणि शिक्षण यामध्ये सवलत मिळावी यासाठी कर्णबधिरांनी आज पुण्यामध्ये समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन केले होते. मात्र हे आंदोलन चिघळल्याने पोलिसांकडून लाठीचार्ज करावा लागला आहे. यामध्ये अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले आहेत.

आपल्या विविध मागण्यांसाठी पुण्यात करण्यात आलेल्या कर्णबधिरांच्या आंदोलनाला गालबोट लागले असून आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून कर्णबधिर आंदोलकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप कांबळे यांनी दिले असून उद्या, मंगळवारी कर्णबधिरांच्या मागण्यांवर आंदोलनकर्त्यांसोबतची बैठक मुंबईत पार पडेल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.


पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आज सकाळपासून कर्णबधिरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. सकाळपासून या आंदोलनात तीन ते चार हजार कर्णबधिरांनी सहभाग घेतला होता. ‘सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. जो पर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही. तो पर्यंत आम्ही आमचे आंदोलन सुरु ठेवणार’ असल्याचा इशारा कर्णबधिरांनी यावेळी दिला. मात्र अचानक हे आंदोलन चिघळल्याने कर्णबधिरांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने एकच गोंधळ उडाला. यामध्ये अनेक कर्णबधिरांना जखमा देखील झाल्या आहेत.

- Advertisement -

या मागण्यांसाठी केले आंदोलन

कर्णबधिरांनी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांच्या या समस्यांच्या बाबतीत सरकार उदासीन असून त्यांच्या मागण्यांकडे सरकार सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. नोकरी आणि शिक्षण यामध्ये सवलत मिळावी, त्याचप्रमाणे शिक्षण, रोजगार यांच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करुन द्यावा अशी त्यांची मागणी असून याकरता कर्णबधिरांनी हा मोर्चा केला असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ‘आमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या कर्णबधिर नागरिकांनी हे आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये अनेक तरुणांचा देखील सहभाग होता. जर सरकारने तातडीने काही पावले उचलली नाहीत तर मुंबईकडे मोर्चा काढून चालत जाण्याचं त्यांनी ठरवलं आहे. परंतप पोलिसांनी याला परवानगी दिलेली नाही.

मतदानावर बहिष्कार टाकू

कर्णबधिरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्तालयासमोर आज आंदोलन केले आहे. मात्र आंदोलन चिघळल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. आम्ही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते काय सांगत आहेत, ते आम्हाला कळत नव्हते आणि आम्ही काय सांगतोय ते त्यांना समजत नव्हते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले आहे. यामध्ये अनेक तरुण जखमी देखील झाले आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतापलेल्या मूकबधिर आंदोलकांनी आक्रमक धोरण स्विकारले असून सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो

आम्ही शांततेत मोर्चा काढत होतो. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. दरम्यान, पोलिसांनी आता आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहेत.


हेही वाचा – नालासोपारा आंदोलन चिघळले; पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज

हेही वाचा – अहमदनगर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यावर लाठीचार्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -