मुंबई : देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदानाला काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. परंतु, अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवती विधानसभा समन्वयक अयोध्या पौळ यांनी कल्याण लोकसभेतून स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे. याबाबतची फेसबूक पोस्ट पौळ यांच्याकडून करण्यात आली आहे. पण आज 1 एप्रिल असल्याकारणाने त्यांनी केलेल्या फेसबूक पोस्टवर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (Lok Sabha 2024 : Thackeray group candidate from Ayodhya Paul Kalyan, Facebook post on April 1)
हेही वाचा… Chitra Wagh : शेखचिल्ली स्वप्ने पाहू नका…, चित्रा वाघांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
ठाकरे गटाच्या युवती विधानसभा समन्वयक अयोध्या पौळ या कायमच पक्षाची बाजू मांडताना पाहायला मिळतात. यामुळे त्या अनेकदा ट्रोल देखील होतात. त्यामुळे आता पौळ यांनी कल्याणमधून उमेदवारी मिळाल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याने याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अयोध्या पौळ यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशिर्वादाने #मशाल चिन्हावर शिवसेनेकडून #कल्याण लोकसभा लढवत आहे..🚩💪 ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या #खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद आदरणीय साहेब, आदित्यजी ठाकरे, संजयजी राऊत साहेब, वरुणजी सरदेसाई, साईनाथजी दुर्गे….🙏😊 #शिवसैनिक 🔥 #ShivsenaUBT #UddhavThackeray”
ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी ही पोस्ट शेअर केलेली असली तरी त्यांच्या या पोस्टवर विश्वास ठेवावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आज 1 एप्रिल असल्याकारणाने पौळ या एप्रिल फुल तर करत नाहीये ना, असे सर्वांना वाटू लागले आहे. ज्या कारणामुळे त्यांच्या या पोस्टवर ‘एप्रिल फूल’ अशी कमेंट देखील येऊ लागली आहे. पण यामागील नेमके सत्य काय? हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. ज्यामुळे आता राजकीय वर्तुळातही पौळ यांच्या उलटसुलट चर्चा केल्या जात आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून आधीच सुषमा अंधारे, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुभाष भोईर, केदार दिघे यांचीही नाव चर्चेत आहेत. पण अद्यापही कोणता उमेदवार पक्षाकडून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आलेला नाही. पण आता याच लोकसभेतून अयोध्या पोळ यांचेही नाव समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण याबाबतची अधिकृत माहिती समोर न आल्याने याबाबत केवळ तर्कवितर्क लढवले जात आहेत.