घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागावाटपाचा पेच कायम, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

Subscribe

आठ जागांवर अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असताना महायुतीच्या जागांचे भिजत घोंगडे कशासाठी? असा सवाल आता महायुतीचे कार्यकर्ते करत आहेत.

मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला येत्या दोन दिवसात अर्थात 12 एप्रिल पासून सुरुवात होत असताना अजूनही महायुतीच्या जागांचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर मध्य मुंबई या तीन जागा तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी सिंधूदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर अशा आठ जागांवर अजूनही महायुतीमध्ये एकमत झालेले नाही. महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असताना महायुतीच्या जागांचे भिजत घोंगडे कशासाठी? असा सवाल आता महायुतीचे कार्यकर्ते करत आहेत. (Lok Sabha Election 2024: Seat sharing rift continues in Mahayuti)

राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचाराने जोर धरला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये पहिली तर रामटेकमध्ये आज बुधवारी (ता. 10 एप्रिल) दुसरी सभा पार पडली. महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार निश्चित होऊन ते प्रचारालाही लागले असताना महायुतीच्या काही जागाचा पेच मात्र अद्याप कायम आहे. जागा वाटपात सुरुवातीला महायुतीने आघाडी घेतली होती. मात्र आघाडीने कासवगतीने वाटचाल करीत गुढीपाडव्याच्या शुभ मूहुर्तावर त्यांचे जागा वाटप पूर्ण केले आहे.

- Advertisement -

दक्षिण मुंबई या लोकसभा मतदार संघासाठी भाजपा इच्छूक असून, शिंदेंच्या शिवसेनेने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेकडून तगड्या उमेदवाराचे नाव अद्याप पुढे आलेले नसताना भाजपने राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावासाठी जोर लावला आहे. ही जागा नेमकी कोणाला सोडायची? यावर अजूनही भाजपा आणि शिंदे शिवसेनेत खलबते सुरू आहेत. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केलेली असताना येथून अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. शिवसेना-भाजपा अशा दोघांनीही या मतदारसंघावर दावा केला असला तरी अद्याप दोघांकडेही निवडून येणारा सक्षम उमेदवार नसल्याचे समजते. उत्तर मध्य मुंबईमध्ये विद्यमान खासदार पूनम महाजन यांना बदलून तिथे जिंकून येणारा अन्य उमेदवार देण्याबाबत भाजप गांभीर्याने विचार करीत आहे. अनेक नावाबाबतही भाजपने चाचपणीही केली आहे. मात्र अजूनही त्यांना अंतिम नाव निश्चित करता आलेले नाही. या जागेवर आमदार आशीष शेलार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.

हेही वाचा… Narendra Modi : लोकशाही धोक्यात आहे असे सांगणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी सुनावले खडेबोल

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाने दावा केला असून शिवसेना देखील ही जागा सोडायला बिल्कुल तयार नाही. शिवसेनेकडून रवींद्र फाटक, नरेश म्हस्के इच्छुक आहेत, तर भाजपकडून माजी मंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. हा पेच सुटता सुटत नसून दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील असे सांगितले जात असले तरी ते शिवसेना की भाजपाच्या चिन्हावर लढणार हेच अजून निश्चित झालेले नाही. पालघरची जागा शिवसेनेची असून राजेंद्र गावित यांनी पुन्हा शिवसेनेच्या चिन्हवर निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा दावा आहे. तर पालघर घ्या आणि ठाणे द्या, असा भाजपाकडून आग्रह असल्याचे समजते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत आताच्या घडीला सर्वाधिक चर्चा सुरू आहे. या जागेवर शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक असून तसा त्यांनी सुरुवातीला दावाही केला होता. मात्र नंतर भाजपाकडून नारायण राणे यांच्या नावावर जोर दिला गेल्यावर सामंत यांच्याकडून ही जागा सोडण्यात आल्याचे समाजमाध्यमांवर जाहीर करण्यात आले. मात्र, लगेचच आधीची भूमिका बदलत या जागेवर पुन्हा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे नारायण राणे यांनी प्रचारालाही सुरुवात केल्याने या जागेवरचा तिढा कायम आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी मिळावी, असा शिवसेनेचा आग्रह असताना भाजपा मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरत आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या दिल्लीतील शीर्षस्थ नेत्यांच्या तशा सूचना असल्याचे कळते. त्यामुळे या जागेवरील उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर मधून पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आघाडीवर आहे. दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चातील विनोद पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र अद्याप येथील उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे सध्या तरी महायुतीचे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय एकतर्फी, विश्वजीत कदमांनी व्यक्त केली खंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -