घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय एकतर्फी, विश्वजीत कदमांनी व्यक्त...

Lok Sabha 2024 : उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय एकतर्फी, विश्वजीत कदमांनी व्यक्त केली खंत

Subscribe

सांगली लोकसभेचा मविआतील तिढा सुटला असला तरी सांगलीतील काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासाठीच आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी मविआच्या नेत्यांना विनंती करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत खंत व्यक्त केली.

सांगली : सांगली लोकसभेची जागा ठाकरे गटाकडे गेल्यापासून सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी विशेषतः आमदार विश्वजीत कदम आणि नेते विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यासाठी त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. पण या कोणत्याही भेटीचा फायदा न झाल्याने या नेत्यांनी आज बुधवारी (ता. 10 एप्रिल) पलूसमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मविआच्या नेत्यांना विनंती करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत खंत व्यक्त केली. (Lok Sabha Election 2024 Vishwajeet Kadam expressed his regret regarding decision taken by Uddhav Thackeray)

महाविकास आघाडीकडून काल जागावाटप जाहीर करण्यात आले. सांगली जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आहे, याची पुन्हा एकदा माहिती घ्यावी. सांगलीच्या जागेबाबत पुन्हा फेरविचार करावा, अशी आमची विनंती आहे, असे स्पष्टपणे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत म्हटले की, कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढायची होती म्हणून ही जागा काँग्रेसला देण्यात आली. या परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांनी सांगलीच्या जागेचा दावा केला. या दाव्यातून त्यांनी 21 तारखेला अचानकपणे चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आमच्या राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी भूमिका घेतली.

- Advertisement -

हेही वाचा… Vishwajeet Kadam : मविआने सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा, विश्वजीत कदमांची पक्षश्रेष्ठींना विनंती

परंतु, उद्धव ठाकरे यांनी घेतलेला हा निर्णय एकतर्फी होता, त्यांनी इतर मित्रपक्षांना विश्वासात घेऊन हा निर्णय जाहीर करायला हवा होता. उद्धव ठाकरे यांच्याबाबत आम्हाला व्यक्तीगत आदर आहे. ज्या संघर्षाच्या परिस्थितीतून आज महाराष्ट्रात राजकारण करत आहेत त्याबद्दल आदर आहे. सांगलीचा जो काही राजकीय इतिहास आहे, काँग्रेसच्या नेत्यांची भावना आहे ते समजून घेऊन महाविकास आघाडीने एकत्रित निर्णय घेतला असता तर निश्चितपणे गेल्या 15 दिवसांत जी परिस्थिती निर्माण झाली ती झाली नसती, अशी खंत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

काल मंगळवारी (ता. 09 एप्रिल) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. यामुळे सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेचा तिढा सुटल्याने मविआत सर्व काही आलबेल असल्याचेच पाहायला मिळाले. परंतु, सांगली लोकसभा ही ठाकरे गटासाठी सुटल्याने काँग्रेसच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेमंडळींनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. यासाठी आज (ता. 10 एप्रिल) काँग्रेसचे सांगलीतील आमदार विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका स्पष्ट केली. पण मविआच्या नेत्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत फेरविचार करावा, अशी विनंतीही विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : काँग्रेसच्या सतेज पाटलांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, मोदी-शहा, आदित्यनाथ जरी आले तरी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -