घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर!

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ५ पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर!

Subscribe

राज्यात एकीकडे महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य पाठवण्यावरून राजकारण सुरू झालेलं असताना आता परिषदेवरच्या पदवीधर आणि शिक्षक अशा एकूण ५ मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १ डिसेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. विधान परिषदेवरील शिक्षक आणि पदवीधर अशा एकूण ५ आमदारांचा कालावधी १९ जुलै २०२० रोजी संपला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता अनलॉक झाल्यानंतर या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार १ डिसेंबररोजी या ५ जागांसाठी मतदान होणार आहे. तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ७ डिसेंबरपूर्वी पूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण करणं अनिवार्य असणार आहे.

graduate teacher election

- Advertisement -

विधानपरिषदेतील सतीष चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि अनिल सोले हे पदवीधर आमदार तर श्रीकांत देशपांडे आणि दत्तात्रय सावंत या शिक्षक आमदारांचा कालावधी १९ जुलै रोजी संपला. यापैकी चंद्रकांत पाटील यांची २०१९मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत निवड झाल्यामुळे ती जागा आधीच रिक्त झाली होती.

नव्या निवडणूक कार्यक्रमानुसार, ५ नोव्हेंबरला या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यात येणार असून १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत असेल. १३ नोव्हेंबरला अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल. १ डिसेंबरला सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानासाठीची वेळ ठेवण्यात आली आहे. परिपत्रक निघाल्यानंतर ताबडतोब या मतदारसंघांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यासोबतच कोरोनासंदर्भातल्या नियमांचं देखील पालन करण्याचं बंधन या निवडणुकांमध्ये असणार आहे. त्यामध्ये मास्क घालणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचं पालन अशा महत्त्वाच्या नियमांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -